मुंबई - भारतीय संघ लवकरच इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता बीसीसीआयने खेळाडूंसाठी कडक नियम बनवले आहेत. या नियमांचे पालन केले नाही तर खेळाडूंच्या कारकिर्दीला मोठा धक्का बसू शकतो.
बीसीसीआयने सांगितलं की, इंग्लंड दौऱ्याला जाण्याआधी जर कोणता खेळाडू पॉझिटिव्ह आढळला तर त्याला संघाबाहेर केलं जाणार आहे. यामुळे संघाचे फिजिओ योगेश परमार यांनी, सर्व खेळाडूंना मुंबईमध्ये क्वारंटाईन होण्याआधी सावधानता बाळगण्याचे तसेच स्वत:ला आयसोलेट राहण्याचे निर्देश दिले आहेत.
बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, 'खेळाडूंसोबत त्यांचा परिवार देखील इंग्लंडला जाणार आहे. मुंबईहून सर्वजण इंग्लंडसाठी रवाना होतील. त्याआधी सर्वांना १० दिवसांसाठी क्वारंटाइन राहावे लागणार आहे. बायो बबलमध्ये दाखल झाल्यावर भारतीय संघातील खेळाडू, प्रशिक्षक, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबियातील व्यक्तींची कोरोना चाचणी होणार आहे. या चाचणीत जर या व्यक्ती दोन वेळा निगेटीव्ह आल्या तरच त्यांना इंग्लंडला जाता येणार आहे.'