मुंबई - देशात कोरोनाचा वाढता संसर्ग आणि आयपीएलमध्ये खेळाडूंसह सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आल्याने, बीसीसीआयने आयपीएलच्या चौदाव्या हंगामातील उर्वरित सामने स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावर संमिश्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तर दुसरीकडे स्थगित झालेली स्पर्धा पुन्हा कधी सुरू होणार? याविषयी देखील चर्चा सुरू झाली आहे. अशात बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी या संदर्भात सूतोवाच केले आहे.
राजीव शुक्ला यांनी स्थगित केलेले सामने पुन्हा कधी होणार या संदर्भात माहिती दिली आहे. आम्ही लवकरच भेटणार असून स्थगित करण्यात आलेला हंगाम पूर्ण कधी करता येईल, याविषयीचा निर्णय घेतला जाईल. यासाठी आम्हाला स्पर्धा पूर्ण करण्याची कधी संधी मिळेल, ते देखील पाहावे लागेल, असे राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे.
राजीव शुक्ला यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी, बीसीसीआयने तूर्तास आयपीएल स्पर्धा स्थगित करून एक चांगला निर्णय घेतला आहे. ही स्पर्धा आहे तिथूनच पुन्हा सुरू करण्याबाबत किंवा तिचे पुन्हा नियोजन करण्याबाबतचा निर्णय नंतर घेतला जाईल. देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता खेळाडू आणि सपोर्ट स्टाफसाठी हा निर्णय हितकारक आहे, म्हटलं आहे.