नवी दिल्ली BCCI Net Worth :भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआय (BCCI) जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असल्याचं सर्वश्रुत आहे. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआयची एकूण संपत्ती किती हे जाणून तुम्हाला आश्चर्याचा धक्काच बसेल. या रिपोर्ट्सनुसार, बीसीसीआय दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात श्रीमंत ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डापेक्षा एक-दोन नव्हे तर तब्बल २८ पटीनं श्रीमंत आहे!
बीसीसीआयची संपत्ती किती : अहवालानुसार, गेल्या महिन्यात, बीसीसीआयची एकूण संपत्ती २.२५ अब्ज डॉलर्स (अंदाजे १८,७०० कोटी रुपये) नोंदवली गेली. क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) जगातील दुसरं सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. त्यांची एकूण संपत्ती ६६० कोटी रुपये (७९ दशलक्ष डॉलर्स) आहे. या आकडेवारीवर नजर टाकली तर, बीसीसीआय आणि सीएमध्ये खूप मोठा फरक दिसतो. आयपीएल, महिला प्रीमियर लीग यांसारख्या सतत होणाऱ्या क्रिकेट स्पर्धांमधून बीसीसीआयला भरपूर पैसा मिळतो. याशिवाय, बीसीसीआय दर २-३ वर्षांनी एखादी आयसीसी स्पर्धा देखील आयोजित करते. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या इंग्लंड क्रिकेट बोर्डाची एकूण संपत्ती ४९२ कोटी रुपये आहे.
बीसीसीआयकडे ८५.८८ टक्के संपत्ती : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) या दौऱ्याचं आयोजन करत आहे. अहवालानुसार, सीएसए जगातील ६व्या क्रमांकाचं सर्वात श्रीमंत बोर्ड आहे. त्यांच्याकडे एकूण ४७ दशलक्ष डॉलर्सची संपत्ती आहे. हे बीसीसीआयच्या एकूण संपत्तीपैकी २.०९ टक्के असून, अहवालानुसार, पहिल्या १० बोर्डांच्या एकूण मालमत्तेपैकी ८५.८८ टक्के संपत्ती एकट्या बीसीसीआयकडे आहे.
झिम्बाब्वे न्यूझीलंडपेक्षा श्रीमंत : एखाद्या देशाचा क्रिकेट बोर्ड जेवढा श्रीमंत, तेवढी त्यांची टीम यशस्वी हे समीकरण येथे लागू होत नाही. न्यूझीलंड क्रिकेट संघ पहिल्या आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपचा विजेता आहे. याशिवाय ही टीम गेल्या ४ एकदिवसीय विश्वचषकांमध्ये उपांत्य फेरीपर्यंत पोहचली आहे. मात्र न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या एकूण संपत्तीवर नजर टाकली, तर ते या क्रमवारीत १०व्या स्थानी आहेत. त्यांची एकूण संपत्ती केवळ ७५ कोटी रुपये आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, गेल्या काही वर्षांत रसातळाला गेलेल्या झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज क्रिकेटच्या बोर्डाकडे न्यूझीलंडपेक्षा जास्त संपत्ती आहे. ते ३१७ कोटी आणि १२५ कोटी रुपयांसह अनुक्रमे ७व्या आणि ९व्या स्थानी आहेत.
- भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) - १८,७७१ कोटी रुपये
- क्रिकेट ऑस्ट्रेलिया (CA) - ६६० कोटी रुपये
- इंग्लंड क्रिकेट बोर्ड (ECB) - ४९२ कोटी रुपये
- पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) - ४५८ कोटी रुपये
- बांग्लादेश क्रिकेट बोर्ड (BCB) - ४२५ कोटी रुपये
- क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) - ३९२ कोटी रुपये
- झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड (ZCB) - ३१७ कोटी रुपये
- श्रीलंका क्रिकेट (SLC) - १६६ कोटी रुपये
- वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड (WICB) - १२५ कोटी रुपये
- न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड (NZC) - ७५ कोटी रुपये
हेही वाचा :
- आयपीएल २०२४ च्या लिलावात 'या' ५ खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली