नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर निश्चितच भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. तसेच, बीसीसीआयच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई करण्याची शक्यता असतानाच, चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह :स्टिंग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे चेतन शर्माचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद नक्कीच धोक्यात आले आहे. परंतु, बीसीसीआय त्यांच्या कारकिर्दीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देऊ शकते. परंतु, हा एक तर्क असणार आहे. कारण त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नक्कीच क्रिकेट विश्वात मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे पूर्ण जगात मान्यता असलेल्या बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या 100 टक्के कारवाई होणार हे निर्विवाद आहे. या गोष्टी होण्याअगोदरच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
क्रिकेट खेळाडू फिटनेससाठी घेतात इंजेक्शन :भारतीय खेळाडू टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी फिटनेस नसतानादेखील इंजेक्शनद्वारे आपला फिटनेस 100 टक्के दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मोठ मोठे स्टार खेळाडूसुद्धा सामील आहेत. या स्टींग आॅपरेशनमुळे अनेक खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या खेळाडूंना त्यांचे डाॅक्टरदेखील साहाय्य करतात, असा दावा चेतन शर्मा यांनी आपल्या स्टींग आॅपरेशनमध्ये केला आहे. त्यांनी आणखी खेळाडूंवर आरोप केला की, फिटनेस 100 टक्के असेल तर मॅच खेळण्यास परवानगी दिली जाते. परंतु, खेळाडून 60-70 टक्के फिट असतील, तर ते बाजूला जाऊन इंजेक्शन घेतात आणि स्वतः 100 टक्के फिट दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही मोठी फसवणूक आहे, यामध्ये खेळाडू असे इंजेक्शन घेतात की, जे डोपिंगमध्ये सापडणार नाही. यामुळे अनेक खेळाडूंचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.