नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजाराला कसोटी संघातून वगळण्यात आले आहे. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात निराशाजनक प्रदर्शन करणाऱ्या उमेश यादवलाही संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
यशस्वी जयस्वालला संघात स्थान : युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि मुकेश कुमार यांना प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. आयपीएल 2023 मधील शानदार प्रदर्शनानंतर जयस्वाल निवडकर्त्यांच्या रडारवर होता. आयपीएल मध्ये त्याने 163 च्या स्ट्राइक रेटने 625 धावा केल्या होत्या. मुंबईच्या या क्रिकेटपटूची प्रथम श्रेणीच्या 15 सामन्यांमध्ये 80.21 ची सरासरी असून त्यात त्याने 9 शतके ठोकली आहेत. 265 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.
अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड : मोहम्मद शमीला कसोटी आणि एकदिवसीय अशा दोन्ही सामन्यांमधून ब्रेक देण्यात आला आहे. तर जयदेव उनाडकट, शार्दुल ठाकूर आणि अजिंक्य रहाणेसह अक्षर पटेलने कसोटी संघात आपली जागा कायम राखली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पुनरागमन करणाऱ्या अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. तर जखमी केएल राहुलचा या दौऱ्यासाठी विचार करण्यात आलेला नाही.