नवी दिल्ली : भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला प्रथमच बीसीसीआयच्या 'ए प्लस' श्रेणीत बढती मिळाली आहे. हा करार 2022-23 या वर्षासाठी आहे. जडेजाव्यतिरिक्त अष्टपैलू अक्षर पटेल आणि हार्दिक पंड्या यांना अनुक्रमे बी आणि सी श्रेणीतून ए श्रेणीत बढती देण्यात आली. तर केएल राहुलची पदावनती करून त्याला ए वरून बी श्रेणीत टाकण्यात आले आहे.
शुभमन गिलची बढती : शुभमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांनाही बढती देण्यात आली आहे. ते सी वरून बी श्रेणीत आले आहेत. वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचीही पदावनती करण्यात आली आहे. ठाकूर याला बी मधून सी श्रेणीत टाकण्यात आले आहे. कुलदीप यादव, इशान किशन, दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग आणि केएस भरत हे सर्व नवीन खेळाडू सी ग्रेडमध्ये करारबद्ध आहेत.
अजिंक्य रहाणेला करारातून वगळले : अनुभवी अजिंक्य रहाणे आणि इशांत शर्मा, जे यापूर्वी बी श्रेणीत होते, त्यांना करार देण्यात आलेला नाही. तर भुवनेश्वर कुमार, मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, वृद्धिमान साहा आणि दीपक चहर या तिघांना कंत्राटी यादीतून काढून टाकण्यात आले आहे. बीसीसीआयच्या करार यादीत चार गट आहेत, ज्यामध्ये ए प्लस श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 7 कोटी, ए श्रेणीतील खेळाडूंना 5 कोटी, बी श्रेणीतील खेळाडूंना 3 कोटी आणि सी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 1 कोटी रुपये मिळतात.
बीसीसीआयची पुरुष खेळाडूंच्या करारांची यादी :
- ए प्लस श्रेणी - विराट कोहली, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह
- ए श्रेणी : रविचंद्रन अश्विन, हार्दिक पांड्या, ऋषभ पंत, मोहम्मद शमी, अक्षर पटेल
- बी श्रेणी : केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर,सूर्यकुमार यादव, शुभमन गिल
- सी श्रेणी :शिखर धवन, उमेश यादव, इशान किशन, युझवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर, दीपक हुडा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत
हेही वाचा :MI Vs DC WPL Final : मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर मात करत जिंकली पहिली महिला प्रीमियर लीग ट्रॉफी