नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या अंतिम सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. संघात अजिंक्य रहाणेचे पुनरागमन झाले आहे. अजिंक्य मधल्या फळीत एक चांगला फलंदाज म्हणून कामगिरी करेल. त्याचबरोबर शुभमन गिलचा सलामीवीर फलंदाज म्हणून समावेश करण्यात आला आहे. त्याचवेळी सूर्यकुमार यादव संघाबाहेर राहणार आहे.
भारतीय क्रिकेट संघात रोहित शर्माची कर्णधार आणि केएस भरतची यष्टिरक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल यांना फिरकी गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले आहे. तर शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना वेगवान गोलंदाज म्हणून संघात स्थान मिळाले आहे. रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली अजिंक्य रहाणे आणि केएल राहुल फलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.
ICC वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 चा अंतिम सामना भारतीय क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या 7 जूनपासून खेळवला जाणार आहे. ऑस्ट्रेलियाने आधीच आपला संघ जाहीर केला होता. पॅट कमिन्स ऑस्ट्रेलिया संघाचा कर्णधार असेल.