मुंबई : दुखापतीमुळे गेल्या वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या जसप्रीत बुमराहचे टीम इंडियात धडाक्यात पुनरागमन झाले. बीसीसीआयने आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केली. टी-20 मध्ये जसप्रीत बुमराह टीम इंडियाला लीड करणार आहे.
ऋतुराज गायकवाड उपकर्णधार : निवडकर्त्यांनी कर्नाटकचा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाचाही संघात समावेश केला आहे. तर 23 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताचे नेतृत्व करणाऱ्या ऋतुराज गायकवाडला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. बुमराहने गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. मात्र त्यानंतर तो पाठीच्या दुखण्यामुळे संघाबाहेर झाला. त्याच्यावर स्ट्रेस फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया करण्यात आली होती.
टी 20 विश्वचषक आणि आयपीएलला मुकला : दुखापतीनंतर मागीलवर्षी नोव्हेंबरमध्ये बुमराहचे पुनर्वसन सुरू झाले. त्याने डिसेंबरमध्ये पुन्हा गोलंदाजी सुरू केल्यानंतर यावर्षी जानेवारीमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची निवड झाली होती. तथापि, जानेवारीमध्ये फिटनेस चाचणी फेल झाल्यामुळे त्याचे पुनरागमन लांबले. दुखापतीमुळे बुमराह 2022 मधील आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धा आणि २०२३ मधील इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये भाग घेऊ शकला नाही. मार्चमध्ये बुमराहच्या पाठीवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी तो संघात परतला. मात्र दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याने त्याला माघार घ्यावी लागली होती.