नवी दिल्ली :आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्याच्या एका दिवसानंतर, बांग्लादेशचा अनुभवी फलंदाज तमीम इक्बालने शुक्रवारी आपला निर्णय मागे घेतला. पंतप्रधान शेख हसीना यांच्या हस्तक्षेपानंतर त्याने ही घोषणा केली. 34 वर्षीय तमीम इक्बालने त्याची पत्नी, माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा आणि बीसीबी अध्यक्ष नझमुल हसन यांच्यासमवेत पंतप्रधानांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर त्याने मीडियाला आपल्या निर्णयाची माहिती दिली.
'पंतप्रधानांना नाही म्हणू शकत नाही' : तमीम इक्बाल म्हणाला, 'आज दुपारी पंतप्रधानांनी मला त्यांच्या घरी बोलावले. त्यांनी मला फटकारले आणि मला पुन्हा खेळण्यास सांगितले. त्यामुळे मी निवृत्तीतून पुनरागमन करण्याचा निर्णय घेतला आहे'. तो म्हणाला की, 'मी प्रत्येकाला नाही म्हणू शकतो, मात्र पंतप्रधानांना नाही म्हणणे माझ्यासाठी अशक्य होते. पंतप्रधानांनी मला उपचार आणि इतर गोष्टींसाठी दीड महिन्याचा ब्रेकही दिला आहे. मी मानसिकदृष्ट्या मोकळा झाल्यावर बाकीचे सामने खेळेन'.
गुरुवारी अचानक निवृत्ती जाहीर केली होती : तमिम इक्बालने गुरुवारी एका भावनिक पत्रकार परिषदेत अचानक निवृत्तीची घोषणा केली होती. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने बांगलादेशचे कर्णधारपद भूषवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा निर्णय घेतला. भारतातील 2023 एकदिवसीय विश्वचषकाच्या काही महिन्यांपूर्वी तमीमची निवृत्ती धक्कादायक होती. संघ व्यवस्थापनाशी वाद झाल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षांनी पत्रकार परिषदेत तमिमच्या संघातील स्थानावर टीका केली होती. तमिमने म्हटले होते की, तो अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नाही, तरीही संघात खेळेल.
बीसीबी अध्यक्षांनी निर्णय मागे घेण्याची विनंती केली :तमिमने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याचे जाहीर केल्यावर, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने तातडीची बैठक बोलावली आणि अफगाणिस्तानविरुद्धच्या उर्वरित दोन एकदिवसीय सामन्यांसाठी लिटन दासची अंतरिम कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रात्री उशिरा प्रसारमाध्यमांना संबोधित करताना बीसीबी अध्यक्ष नजमुल यांनी जाहीरपणे तमीमला त्याचा 'भावनिक' आणि 'घाईचा' निर्णय मागे घेण्याची विनंती केली होती.
हेही वाचा :
- Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा केनियामध्ये सन्मान, मसाई मारा लोकांनी दिला 'गार्ड ऑफ ऑनर'
- HAPPY BIRTHDAY MS DHONI : महेंद्रसिंग धोनीचा 42 वा वाढदिवस; जाणून घ्या धोनीशी संबंधित 42 खास गोष्टी...