नवी दिल्ली -आगामी आयपीएल सत्रासाठी खेळाडूंच्या लिलावाअगोदरच काही संघांनी आपल्या खेळडूंना संघात राखले आहे. आयपीएल मधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मंगळवारी आपला पूर्व कर्णधार विराट कोहलीला रिटेन ( संघात राखून ठेवणे ) केले आहे. तसेच, मुंबई इंडियन्सने देखील भारताचा टी २० सामन्यांचा कर्णधार रोहित शर्मा आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला रिटेन केले आहे.
हेही वाचा -Gautam Gambhir : गौतम गंभीरला ठार मारण्याची आईएसआईएसकडून धमकी
भारताचा माजी कर्णधार आणि धुवाधार फलंदाजीसाठी ओळख असलेल्या महेंद्र सिंह धोनी आणि ऑलराउंडर रविंद्र जडेजा आपल्या आधीच्या संघात म्हणजेच, चेन्नई सूपर किंग्समध्ये कायम राहणार आहेत. धोनी हे आपल्या संघात जडेजा नंतर रिटेन होणारे दुसरे खेळाडू आहेत. संघाने ऋतुराज गायकवाड आणि मोईन अलीला देखील रिटेन केले आहे. हे खेळाडू आपल्या मूळ संघात कायम राहणार असल्याने पुढील आयपीएल सत्रामध्ये या संघांच्या फॅन्सना पुन्हा आपले आवडते खेळाडू आपल्या आवडत्या संघात पहायला मिळणार आहेत.
आगमी आयपीएल सत्रासाठी मेगा लिलावाअगोदर आठ जुन्या संघांना ३० नोव्हेंबरपर्यंत रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी सोपवायची होती. या पार्श्वभूमीवर काही संघांनी आपले खेळाडू रिटेन केले आहे. तसेच, पुढील आयपीएल सत्रात दोन नवे संघ लखनऊ आणि अहमदाबादचा समावेश होणार आहे.