वेलिंग्टन :आयसीसी महिला विश्वचषक ( ICC Women's World Cup ) स्पर्धेतील चौदावा सामना मंगळवारी वेलिंग्टन येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज संघात खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने वेस्ट इंडिज संघावर सात विकेट्सने मात केली. या विजयात एलिसे पेरी (3/22) आणि एशले गार्डनर (3/25) यांच्या शानदार गोलंदाजीचे योगदान महत्वपूर्ण ठरले.
या सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाने ( West Indies women's team ) नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 45.5 षटकांत सर्वबाद 131 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिज संघाकडून स्टेफनी टेलरने सर्वाधिक धावा केल्या. तिने 91 चेंडूचा सामना करताना 3 चौकारांच्या मदतीने 50 धावा केल्या.
परंतु तिला संघातील इतर फलंदाजांकडून योग्य साथ मिळाली नाही. या संघातील इतर कोणत्याच फलंदाजाला 20 धावांचा आकडा पार करता आला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक लक्ष्य उभारण्यात अपयश आले. ऑस्ट्रेलिया संघाकडून गोलंदाजी करताना एलिसे पेरी (3/22) आणि एशले गार्डनर (3/25) यांनी शानदार प्रदर्शन केले. त्याचबरोबर जोनासेनने 2 विकेट्स घेतल्या.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने ( Australian women's team ) दमदार गोलंदाजी केल्यामुळे त्यांना 132 धावांचे लक्ष्य मिळाले होते. या आव्हानाचा पाठलगा करताना ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. ज्यामध्ये ऑस्ट्रेलिया संघाने सात धावांवर आपल्या दोन विकेट्स गमवाल्या होत्या. त्यानंतर या संघाची तिसरी विकेट्स 58 धावांवर एलिसे पेरीच्या रुपाने गेली. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया संघाने एक ही विकेट्स न गमावता, राचेल हेन्सच्या आणि बेथ मूनीच्या यांच्या अनुक्रमे 83 आणि 28 धावांच्या जोरावर आव्हान पूर्ण केले.