मुंबई - भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने तिच्या कारकिर्दीत 20 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यात स्थानिक क्रिकेट आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील धावांचा समावेश आहे. तिने हा विक्रम ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात पूर्ण केला. मिताली राजने या सामन्यात 61 धावांची खेळी केली. मितालीचे हे सलग पाचवे अर्धशतक ठरले. तिने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद 79 धावांची खेळी केली होती. त्यानंतर तिने इंग्लंडविरूद्धच्या तीन सामन्याच्या मालिकेत 72, 59 आणि नाबाद 75 धावा केल्या होत्या.
टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती
मिताली राजने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. या फॉरमॅटमध्ये तिने 2 हजार 354 धावा केल्या. ती ऑलओव्हर टॅलीमध्ये सातव्या स्थानावर आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी मिताली राज -
मिताली राज एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी पहिली महिला खेळाडू आहे. तिने 218 सामन्यात 7 हजार 365 धावा केल्या आहेत. या यादीत इंग्लंडची चार्टोट एडवर्ड्स दुसऱ्या स्थानावर आहे. तिच्या नावे 5 हजार 992 धावा आहेत.