मेकॉय (ऑस्ट्रेलिया) -भारतीय महिला संघ आणि ऑस्ट्रेलिया महिला संघ यांच्यात एकदिवसीय मालिका खेळवण्यात येत आहे. उभय संघातील या मालिकेच्या पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलिया संघाने 9 गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाची सलामीवीर फलंदाज राचेल हेन्सने या सामन्यात दमदार कामगिरी केली. पण आता तिला दुखापत झाल्याचे समोर आले आहे. यामुळे ऑस्ट्रेलिया संघाची चिंता वाढली आहे.
राचेल हेन्सला सराव सत्रात दुखापत झाली. तिच्या हाताला चेंडू लागला आहे. यामुळे ती भारताविरुद्धच्या पुढील सामन्यात खेळणार की नाही, याबाबत शाशंकता आहे.
राचेल हेन्सने पहिल्या सामन्यात नाबाद 93 धावांची खेळी करत संघाला एकहाती विजय मिळवून दिला. हेन्सच्या हाताचा स्कॅन करण्यात आला आहे.
क्रिकेट डॉट कॉम एमयूच्या नुसार, राचेल हेन्सने दुखापत झाल्यानंतर सराव सत्रातून माघार घेतली. ऑस्ट्रेलियाचे फिजिओ केट बीयरवर्थ यांनी सांगितलं की, राचेल हेन्सच्या हाताला दुखापत झाली असून तिचा स्कॅन करण्यात आला आहे.