नवी दिल्ली :चीनमध्ये होणार्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाला थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. 1 जूनपर्यंतच्या आयसीसी टी 20 क्रमवारीच्या आधारे, भारत, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार संघांना उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. स्पर्धेमध्ये पुरुषांच्या संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करणार असून, महिलांच्या संघाचे नेतृत्व हरमनप्रीत कौरकडे आहे. पुरुषांच्या स्पर्धेत 18 संघ तर महिलांच्या स्पर्धेत 14 संघ खेळणार आहेत.
हरमनप्रीत उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकणार नाही : मात्र भारतासाठी एक वाईट बातमी आहे. भारताच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरवर आयसीसीने दोन सामन्यांची बंदी घातली आहे. त्यामुळे हरमनप्रीत स्पर्धेमध्ये भारत अंतिम फेरीत पोहोचेल तेव्हाच खेळू शकणार आहे. हरमनप्रीतवर अलीकडेच बांगलादेशविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात अंपायरवर जाहीर टीका केल्याबद्दल दोन सामन्यांची बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे ती उपांत्यपूर्व फेरीत खेळू शकणार नाही. महिलांची स्पर्धा 19 सप्टेंबरपासून सुरू होणार असून, 26 सप्टेंबर रोजी सुवर्ण आणि कांस्यपदकांची लढत होणार आहे.
..तर भारताला सलग तीन दिवस खेळावे लागेल : पुरुषांची स्पर्धा 28 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. तर अंतिम सामना 7 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. जर भारतीय क्रिकेट संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरला तर त्यांना 5 ऑक्टोबर (उपांत्यपूर्व फेरी), 6 ऑक्टोबर (उपांत्य फेरी) आणि 7 ऑक्टोबर (फायनल) असे सलग तीन दिवस मॅच खेळावी लागणार आहे. भारताची उपांत्यपूर्व फेरीची लढत अफगाणिस्तान किंवा बांगलादेश विरुद्ध होण्याची शक्यता आहे.
अव्वल संघ आपली दुय्यम टीम पाठवतील : या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांगलादेश व श्रीलंका हे अव्वल चार संघ आपली दुय्यम टीम पाठवणार आहेत. कारण याच काळात भारतात आयसीसी विश्वचषकाचे आयोजन होणार आहे. 23 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या हँगझोऊ गेम्समध्ये पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे एकूण 32 सामने होणार आहेत. यामध्ये पुरुषांचे 18 आणि महिलांचे 14 सामने आहेत. भारतीय संघाचे सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजल्यापासून सुरू होणार आहेत.
हेही वाचा :
- India Vs Pakistan : भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख बदलणार, 'हे' आहे कारण
- Hockey India : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हॉकी संघाची घोषणा, हरमनप्रीत सिंगकडे संघाचे नेतृत्व
- Rinku Singh : आशियाई क्रीडा स्पर्धेत रिंकू सिंह असणार टीम इंडियाचा हुकुमी एक्का