कोलंबो Asia Cup २०२३ :आशिया चषक आता अंतिम टप्प्यात आला असून, रविवारी (१७ सप्टेंबर) अंतिम सामन्यात भारताचा मुकाबला श्रीलंकेशी आहे. मात्र हा आशिया चषक एका वेगळ्याचं कारणानं चर्चेत आलाय. आशिया चषक स्पर्धेत केवळ भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला होता. स्पर्धेतील अन्य कोणत्याही सामन्यासाठी राखीव दिवस ठेवण्यात आला नाही. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही राखीव दिवशी निकाली लागला. यामुळे नवा वाद निर्माण झालाय. जगभरातील आजी-माजी क्रिकेट खेळाडू, समालोचक तसेच क्रिकेट पंडित आयसीसीच्या या निर्णयावर कडाडून टीका करत आहेत.
..तर क्रिकेट धोक्यात येईल : आता श्रीलंकेचा माजी वर्ल्डकप विजेता कर्णधार अर्जुन रणतुंगा यानं या मुद्यावरून आयसीसीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय. 'एक किंवा दोन संघांच्या बाजूनं नियमांमध्ये बदल केल्यास क्रिकेट धोक्यात येईल', असं तो म्हणाला. 'तुम्ही आशिया कपचं आयोजन करा. मात्र आपल्याकडे स्पर्धेपूर्वी काही नियम बनवण्यात आले आहेत. त्या एका सामन्यापूर्वी (भारत विरुद्ध पाकिस्तान) त्यांनी नियम बदलले. एसीसी (Asian Cricket Council) कुठे आहे? आयसीसी (International Cricket Council) कुठे आहे?' असे प्रश्न रणतुंगा यानं विचारले.