नवी दिल्ली : १६ व्या आशिया चषकाला आजपासून (३० ऑगस्ट) सुरुवात होत आहे. पाकिस्तानच्या मुलतान क्रिकेट स्टेडियमवर पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात पहिला सामना होईल. स्पर्धेतील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. जेव्हा-जेव्हा या दोन संघांमध्ये सामना होतो, तेव्हा एंटरटेनमेंटची पूर्ण गॅरंटी असते. २ सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमनेसामने येतील.
कर्णधार म्हणून रोहित शर्माचा शानदार रेकॉर्ड : या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माकडून चाहत्यांना फार अपेक्षा आहेत. याला कारणही तसंच आहे. आशिया चषकात कर्णधार म्हणून रोहित शर्माचा रेकॉर्ड शानदार आहे. या स्पर्धेत त्यानं कर्णधार म्हणून अद्याप एकही सामना गमावलेला नाही. त्याच्याव्यतिरिक्त केवळ पाकिस्तानच्या मोईन खानच्या नावे हा विक्रम आहे. आता या स्पर्धेत रोहित स्वत:चा हा विक्रम टिकविण्याचा प्रयत्न करणार आहे.
कर्णधार म्हणून सर्व सामने जिंकले : रोहित शर्मानं आशिया चषकात खेळाडू म्हणून अनेक सामने खेळले आहेत. परंतु त्याने त्यापैकी केवळ पाच सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवलंय. विशेष म्हणजे, त्यानं हे सर्व सामने जिंकले आहेत. सध्या त्याचा विजय - पराजय रेकॉर्ड १०० टक्के आहे. रोहित शर्माप्रमाणेच आशिया चषकात कर्णधार म्हणून सर्व सामने जिंकण्याचा विक्रम पाकिस्तानच्या मोईन खानच्या नावावर आहे. त्याने ६ सामन्यात कर्णधारपद भूषवले असून, सर्व सामने जिंकले आहेत.
इतर कर्णधारांचे रेकॉर्ड : महेंद्रसिंह धोनी आणि श्रीलंकेचा माजी कर्णधार अर्जुन रणतुंगा यांनाही आशिया चषकातील यशस्वी कर्णधारांमध्ये गणलं जातं. या दोघांनी या स्पर्धेत आपल्या संघाला प्रत्येकी ९ सामन्यांत विजय मिळवून दिलाय. याशिवाय कर्णधार म्हणून पाकिस्तानच्या मिसबाह - उल - हकने ७ आणि श्रीलंकेच्या महेला जयवर्धनेने ६ सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेच्याच अँजेलो मॅथ्यूज आणि भारताच्या मोहम्मद अझरुद्दीन यांच्या नावावर प्रत्येकी पाच सामने जिंकण्याचा विक्रम आहे.
हेही वाचा :
- Dhyan Chand : अनवाणी पायानं खेळणाऱ्या ध्यानचंद यांना पाहून हिटलरंनं दिली होती 'ही'ऑफर! जाणून घ्या
- Yo Yo Test : ना हार्दिक, ना विराट; टीम इंडियाच्या यो-यो टेस्ट मध्ये 'हा' खेळाडू अव्वल
- Indian Women Blind Cricket : भारतीय महिला अंध क्रिकेट संघानं वर्ल्ड गेम्समध्ये जिंकले सुवर्णपदक, पंतप्रधानांकडून कौतुक