मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमध्ये बुधवार रात्री पार पडलेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने कोलकाता नाईट रायडर्स संघावर विजय मिळवला. चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २२० धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल केकेआरचा संघ १९.१ षटकात २०२ धावांवर सर्वबाद झाला. केकेआर हा सामना १८ धावांनी पराभूत झाला. परंतु केकेआरने आयपीएलच्या इतिहासात नव्या विक्रमांची नोंद केली.
चेन्नईने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरचा निम्मा संघ ३१ धावांवर तंबूत परतला होता. त्यानंतर केकेआरने १७१ धावा केल्या. हा आयपीएलमध्ये कोणत्याही संघाने ५ गडी बाद झाल्यानंतर केलेली सर्वोच्च धावसंख्या आहे. याआधी हा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या नावे होता. २०१६ मध्ये गुजरात लॉयन्स संघाने दिलेल्या १५९ धावांचा पाठलाग करताना बंगळुरूचा निम्मा संघ २९ धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर बंगळुरूने १३० धावा केल्या होत्या.
५ गडी बाद झाल्यानंतर केकेआरने १७१ धावा केल्या. टी-२० इतिहासातील या दुसऱ्या सर्वोच्च धावा आहेत. याआधी सर्वात जास्त धावा जमैका थलावाज संघाने काढल्या आहेत. सीपीएल २०१८ मध्ये जमैकाचे त्रिनबागो नाईट रायडर्सच्या २२४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ४१ धावात ५ गडी बाद झाले होते. त्यानंतर जमैकाच्या संघाने १८४ धावा केल्या. या सामन्यात जमैकाकडून आंद्रे रसेलने ४९ चेंडूत १२१ धावांची खेळी केली होती.