मुंबई Ajinkya Rahane :भारतीय संघ 25 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. बीसीसीआयनं या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. मात्र या संघामध्ये अनुभवी खेळाडू अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं नाही. यावर आता रहाणेनं प्रतिक्रिया दिली आहे. "मला भारतीय संघासाठी 100 कसोटी सामने खेळायचे आहेत", असं तो म्हणाला.
भारतासाठी 100 कसोटी सामने खेळण्याचं ध्येय : "माझं ध्येय रणजी करंडक आणि भारतासाठी 100 कसोटी सामने खेळण्याचं आहे. मुंबईसाठी चांगली कामगिरी करणं, हे माझं लक्ष आहे. मला रणजी ट्रॉफीमध्ये सातत्यानं चांगली कामगिरी करायची आहे. यासाठी मी प्रत्येक सामन्यात एका वेळी एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतो", असं अजिंक्य रहाणे म्हणाला. आंध्रप्रदेशविरुद्धच्या रणजी सामन्यानंतर त्याने ही प्रतिक्रिया दिली. या सामन्यात त्याला खातंही उघडता आलं नाही.
रहाणेची कसोटी कारकिर्द : अजिंक्य रहाणे सध्या मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे. रहाणेच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचं तर, त्यानं 85 कसोटी सामन्यांच्या 144 डावांमध्ये 5077 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने 12 शतकं आणि 26 अर्धशतकं ठोकली. यामध्ये त्याचा स्ट्राइक रेट 49.50 आहे. आता 100 कसोटी सामने खेळण्याचं उद्दीष्ट घेऊन तो भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी सतत मेहनत घेत आहे.
आफ्रिकेविरुद्ध निवड झाली नाही : अजिंक्य रहाणेनं 2023 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला टीममधून वगळण्यात आलं. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. अलीकडेच माजी भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रानं म्हटलं होतं की, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारासाठी भारतीय संघाचे दरवाजे बंद झाले आहेत. आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दोघांची निवड झाली नव्हती. त्यांची इंग्लंडविरुद्ध निवड व्हायला हवी होती, असं तो म्हणाला.
हे वाचलंत का :
- धोनीलाही मिळालं राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण, आतापर्यंत 'या' क्रिकेटपटूंना बोलावण्यात आलंय
- मुंबईकर दुबे अन् जयस्वालनं नेला सामना खेचून, भारताचा अफगाणिस्तानवर दणदणीत विजय
- शाकिब अल हसनचा आणखी एक कारनामा, गर्दीत चाहत्याच्या कानशिलातच लगावली