बासेल -भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य सामन्यात तिने चीनच्या चेन यू फेई हिचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सिंधूने चीनच्या फेईचा २१-७, २१-१४ असा पराभव केला. हा सामना ४० मिनिटे रंगला होता. यात सिंधूने बाजी मारली. या विजयासह सिंधूने रौप्य पदक पक्के केले आहे.
पी. व्ही सिंधूने सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. ती पहिल्या गेममध्ये ६-२ ने पुढे होती. त्यानंतरही हाच धडाका कायम ठेवत ती ११-३ ने पुढे राहत पाहिला सेट २१-७ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये चीनची खेळाडू फेई हिने सामन्यात परतण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिंधूने अखेर २१-१४ ने बाजी मारत सामना जिंकला. २०१६ सालच्या रियो दि जानेरो येथील उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेमध्ये महिलांच्या एकेरी गटामध्ये सिंधूने रौप्य पदक मिळवले आहे.
दरम्यान, सिंधूने सलग तिसऱ्यांदा महिला एकेरीच्या गटात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. रॅटचानोक इन्टानोन आणि नोझोमी ओखुरा यांच्यात उपांत्यफेरीचा दुसरा सामना होणार आहे. यांच्यातील विजेत्याशी अंतिम फेरीत सिंधूची गाठ पडेल.