नवी दिल्ली - भारतीय महिला बॅडमिंटन स्टार पी.व्ही. सिंधूची माजी प्रशिक्षक किम जी ह्यून यांनी सिंधु असंवेदनशील असल्याचे म्हटले आहे. ह्यून यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी झालेल्या जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये सिंधुने विजेतेपद जिंकून इतिहास रचला. त्यानंतर, ह्युन यांनी आपल्या आजारी पतीची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला होता.
हेही वाचा -आयसीसी कसोटी क्रमवारी : कोहलीचे वर्चस्व तर, 'या' मुंबईकर क्रिकेटपटूचे स्थान घसरले
'ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधू अत्यंत असंवेदनशील व्यक्ती आहे. कारण जेव्हा वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी बासेल गाठल्यानंतर मी आजारी पडली होती. तेव्हा ती मला भेटायलाही आली नाही किंवा माझी प्रकृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही', असे ह्युनने कोरियन यु ट्यूब वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
'मी वैयक्तिकरित्या सिंधूलाही बरेच प्रशिक्षण दिले आहे. ती खूपच शक्तिशाली आहे आणि उत्तम कामगिरी करते. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या आधी मी आजारी पडली होती. मी रुग्णालयात गेली, तिथे मला पाच वेळा इंजेक्शन देण्यात आले. पण कोणीही मला भेटायला आले नाही', असा गौप्यस्फोट ह्युन यांनी केला आहे.
सिंधूच्या विश्वविजेतेपदामध्ये ह्युनचा मोलाचा वाटा होता. राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनीही ह्यूनने महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे म्हटले होते. वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर ह्यूनच्या योगदानाचे कौतुक झाले.