जकार्ता -भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधुने महिला एकेरीमध्ये इंडोनेशिया मास्टर्सच्या दुसर्या फेरीत प्रवेश केला, तर सायना नेहवाल पहिल्या फेरीत पराभूत झाली. पाचव्या मानांकित सिंधुने पहिल्या फेरीत अया ओहरीला १४-२१, २१-१५, २१-११ असे पराभूत केले. सिंधूने ५९ मिनिटांत हा सामना जिंकला.
हेही वाचा -क्रिकेटमध्ये घडला इतिहास, पुरुषांच्या सामन्यात महिला करणार 'पंचगिरी'
या विजयासह जागतिक क्रमवारीत ६व्या स्थानी असलेल्या सिंधूने ओहरी विरुद्ध १०-० अशा विजयाची नोंद केली आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या मलेशिया मास्टर्समध्ये सिंधूने ओहरीचा पराभव केला होता. दुसर्या फेरीत सिंधूचा सामना जपानच्या सयाका ताकाहाशीशी होईल. ताकाहाशीने पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवालचा पराभव केला.
जागतिक क्रमवारीत १४ व्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या सयाका ताकाहाशीने ११ व्या स्थानी असलेल्या सायनाला १९-२१, २१-१३, २१-५ ने पराभूत केले. या विजयासह ताकाहाशीने सायनाविरुद्ध कारकिर्दीची नोंद ३-४ अशी केली आहे.
ताकाहाशीविरुद्ध सायनाचा हा सलग तिसरा पराभव आहे. गेल्या वर्षी डेन्मार्क ओपन आणि थायलंड ओपन स्पर्धेतही ताकाहाशीने सायनाचा पराभव केला होता. गेल्या आठवड्यात पार पडलेल्या मलेशिया मास्टर्सच्या उपांत्यपूर्व फेरीतही सायनाचा पराभव झाला होता.