हैदराबाद -भारताची 'फुलराणी' सायना नेहवाल एका मोठ्या संकटात अडकली आहे. डेन्मार्कमधील आगामी बॅडमिंटन स्पर्धेमध्ये बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि किदम्बी श्रीकांत यांना भाग घेता येणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. डेन्मार्कचा व्हिसा मिळू न शकल्याने सायनाला या स्पर्धेत भाग घेता येणार नसल्याची शक्यता आहे.
हेही वाचा -'आता रात्रीचे डायपर्स बदलण्यासाठी तयार राहा', सचिनचा रहाणेला गमतीशीर सल्ला
या प्रकरणावर नाराज होऊन सायनाने परराष्ट्र खात्याला एक ट्विट केले. या ट्विटमध्ये सायनाने परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना व्हिसा मिळण्याबाबत विनंती केली. 'मला व माझ्या प्रशिक्षकासाठी डेन्मार्कला जाण्यासाठी व्हिसा द्यावा. मला पुढच्या आठवड्यात ओडेन्स येथे होणाऱ्या स्पर्धेत खेळायचे आहे आणि आमचा व्हिसा अद्याप आलेला नाही. पुढील आठवड्यात मंगळवारी माझा सामना होणार आहे', असे ट्विट सायनाने केले आहे.
नुकत्याच पार पडलेल्या कोरिया ओपन स्पर्धेमध्ये सायना खेळली नव्हती. दुखापतीमुळे सायनाने सामना अर्ध्यांतून सोडण्याचा निर्णय घेतला, यामुळे प्रतिस्पर्धी खेळाडूला विजयी घोषित करण्यात आले होते. महिला गटातील पहिल्या फेरीत भारताच्या सायना नेहवालचा सामना दक्षिण कोरियाच्याच किम गा इयून हिच्याशी झाला होता. या सामन्यात तिसऱ्या गेमनंतर सायनाला दुखापत झाली. यामुळे तिने सामना अर्ध्यांतून सोडण्याचा निर्णय घेतला होता.