बँकॉक -भारताची 'फुलराणी' सायना नेहवालची निराशाजनक कामगिरी थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेतही कायम राहिली. थायलंड मास्टर्सच्या पहिल्या फेरीत महिला एकेरीमध्ये सायनाला डेन्मार्कच्या लिन होजमार्कने १७-२१, २२-२०, १९-२१ असे पराभूत केले.
हेही वाचा -रणजी ट्रॉफी : मुंबई-उत्तर प्रदेश लढत अनिर्णीत, सर्फराजचे त्रिशतक
सायनाच्या पराभवामुळे या स्पर्धेतील भारताचे आव्हान संपुष्टात आले. तर, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, समीर वर्मा आणि एचएस प्रणॉय यांनाही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. पाचव्या मानांकित श्रीकांतला पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या चेशाइर हिरेन राउटावेटोकडून २१-१२, १४-२१, ११-२१ असा पराभव स्वीकारला लागला.
यापूर्वी श्रीकांतला पहिल्या फेरीत इंडोनेशिया मास्टर्स आणि मलेशिया मास्टर्समध्येही पराभव पत्करावा लागला होता. श्रीकांत सध्या बीडब्ल्यूएफच्या रेस टू टोकियो क्रमवारीमध्ये २३ व्या स्थानावर असून आजच्या पराभवानंतर, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील त्याचा सहभाग अनिश्चित बनला आहे. २६ एप्रिलला ऑलिम्पिकसाठी 'क्वालीफिकेशन कट ऑफ' आहे.