नवी दिल्ली - भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू जानेवारी २०२१ मध्ये कोर्टात पुनरागमन करणार आहे. त्यावेळी सिंधू कमीतकमी तीन स्पर्धांमध्ये भाग घेणार आहे. लक्ष्य ऑलिम्पिक पोडियम योजनेचा (टीओपीएस) सिंधू भाग असून ती आता पुढील वर्षी १२ ते १७ जानेवारी दरम्यान होणाऱ्या थायलंड ओपनमधून बॅडमिंटन कोर्टात पुनरागमन करेल.
हेही वाचा -फिफा क्रमवारी : भारतीय महिला संघाला दोन स्थानांचा फायदा
रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेती सिंधू १९ ते २४ जानेवारी दरम्यान होणाऱ्या टोयोटा थायलंड ओपन आणि नंतर बँकॉक येथे वर्ल्ड टूर फायनल्समध्ये खेळेल. तथापि, ती अद्याप वर्ल्ड टूर फायनल्ससाठी पात्र ठरलेला नाही. स्पर्धेत तिच्याबरोबर फिजिओ आणि फिटनेस प्रशिक्षक ठेवण्याची सिंधूची विनंती क्रीडा मंत्रालयाने मान्य केली आहे.
भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) शुक्रवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या तीन स्पर्धांसाठी त्यांच्या फिजिओ आणि प्रशिक्षकाच्या सेवांना मान्यता देण्यात आली असून यासाठी सुमारे ८.२५ लाख रुपये खर्च येईल. यावर्षी मार्चमध्ये सिंधूने ऑल इंग्लंडमध्ये शेवटची स्पर्धा खेळली होती. त्यानंतर सिंधूने सप्टेंबरमध्ये डेन्मार्क ओपनमधून माघार घेतली होती. त्यानंतर तिने थॉमस आणि उबर कपमध्ये खेळण्यास सहमती दर्शवली. मात्र ही स्पर्धा स्थगित करण्यात आली.