नवी दिल्ली - २०१९ मध्ये विश्वविजेतेपदाचा किताब जिंकणारी भारताची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक जिंकण्याचे ध्येय असल्याचे सांगितले. विश्वविजेतेपदाचा किताब जिंकल्यानंतर सिंधूला त्यानंतरच्या स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. यामुळे तिच्यावर टीका झाली. तेव्हा तिने मी टीकेला घाबरत नसल्याचे सांगितले.
वृत्तसंस्थेशी बोलताना सिंधूने सांगितले की, 'ऑलम्पिकमध्ये सुवर्णदक जिंकणे हे माझे मुख्य लक्ष्य असणार आहे. यानंतर जगातील सर्वोकृष्ठ खेळाडू होणे, हे माझे परम ध्येय असेल. तसेच यासह सुपर सीरीजही जिंकायची आहे.'
सुमार कामगिरीनंतर टीकेला सामोरे जावे लागले, याविषयी सिंधूला विचारले असताना तिने सांगितले की, 'मी टीकेला घाबरत नाही. टीका किंवा अपेक्षांचे ओझे माझ्या वाटचालीत अडसर ठरणार नाहीत. यंदा टोकियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्यासाठी स्वत:चा खेळ सुधारण्यावर भर देत आहे.'