बंगळुरू - भारतीय बॅडमिंटनपटू अश्विनी पोनप्पा आणि लक्ष्य सेन यांनी बंगळुरूच्या प्रकाश पादुकोन बॅडमिंटन अकादमीमध्ये (पीपीबीए) सरावाला सुरूवात केली आहे. या दोघांसह 20 बॅडमिंटनपटू येथे प्रशिक्षण घेत आहेत.
या दोघांव्यतिरिक्त अजय जयराम, मिथुन मंजुनाथ, बीएम राहुल भारद्वाज आणि मेसनम मीराबा हेदेखील प्रशिक्षण घेत आहेत. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (एसएआय) गेल्या महिन्याच्या अखेरीस प्रशिक्षण पुन्हा सुरू करण्यासाठी नियम तयार केले होते. पीपीबीएचे मुख्य प्रशिक्षक आणि संचालक विमल म्हणाले, “काही अव्वल राष्ट्रीय खेळाडू गेल्या दोन आठवड्यांपासून प्रशिक्षण घेत आहेत. आमच्याकडे 16 कोर्ट आहेत आणि 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. आम्ही त्यांच्यासाठी विविध सत्रे तयार केली आहेत. आमच्या 65 प्रशिक्षणार्थींपैकी बहुतेक सध्या शहरात नाहीत. ते येथे येऊन प्रशिक्षण घेण्यासाठी उत्सुक आहे.''