नवी दिल्ली - भारताचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने दिलगिरी व्यक्त केल्यानंतर त्याची 'राजीव गांधी खेलरत्न' क्रीडा पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून (बीएआय) शिफारस करण्यात आली आहे. तर दुसरीकडे अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करणाऱ्या एच. एस. प्रणॉय याला 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली.
श्रीकांत आणि प्रणॉय हे दोघे फेब्रुवारीत मनिला येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचा उपांत्य फेरीचा सामना न खेळता बार्सिलोना येथे अन्य एका स्पर्धेसाठी रवाना झाले होते. यामुळे भारताला तिसऱ्या स्थानी समाधान मानावे लागले होते. दोघांविरुद्ध शिस्तभंग म्हणून बीएआयने क्रीडा पुरस्कारासाठी नावे पाठवली नव्हती.
श्रीकांतने यानंतर क्रीडा मंत्रालयाकडे ई-मेलद्वारे माफी मागितली. यात त्याने भविष्यात अशा चुकीची पुनरावृत्ती न करण्याची हमी दिली आहे. दुसरीकडे प्रणॉयने अर्जून पुरस्कारासाठी नामांकन न दिल्याबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली. यावर बीएआयने त्याला १५ दिवसाच्या आत उत्तर देण्याची नोटीस बजावली. उत्तर न दिल्यास आणखी कठोर कारवाईचा इशारा महासंघाने दिला आहे.