नवी दिल्ली -भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने सोमवारी चाहत्यांना मोठा धक्का दिला. सिंधूने सोशल मीडियावर 'मी निवृत्त होत आहे' अशी पोस्ट शेअर केली. तिचा 'निवृत्ती' हा शब्द पाहून अनेकांना धक्का बसला. मात्र, पोस्टच्या दुसऱ्या पानावर तिने यासंबंधी एक स्पष्टीकरण दिले आहे.
सिंधूने ट्विट करून लिहिले आहे. की कोरोनाच्या जागतिक महामारीचा प्रभाव संपेपर्यंत ती बॅडमिंटन कोर्टात परतणार नाही, परंतु ती सराव करत राहील. सिंधूने लिहिले, "मी आता माझ्या भावनांना वाट करून देत आहे आणि मी या गोष्टींशी सामोरे जाण्यासाठी धडपडत आहे. तुम्हाला धक्का बसला असेल किंवा गोंधळ झाला असेल. पण, या पोस्टच्या शेवटी तुम्हा माझा मुद्दाल कळेल. तुम्हीसुद्धा मला पाठिंबा द्याल.''
सिंधू म्हणाली, ''या कोरोनाच्या महामारीने माझे डोळे उघडले आहेत. मी माझ्या प्रतिस्पर्ध्यांसोबत लढण्यासाठी मेहनत करु शकते. अखेरच्या क्षणांपर्यंत सामन्यात प्रयत्न करु शकते. याआधीही मी हा कारनामा केला आहे. पण मी न दिसणाऱ्या व्हायरसला कसे हरवू. या व्हायरसमुळे घरातून बाहेर जायचे असल्यास स्वत:लाच प्रश्न विचारावा लागतो.या सर्वांचा विचार करत असताना, अनेकांच्या मन हेलावणाऱ्या कथा मी वाचल्या आहेत. तुम्हाला मी प्रश्न विचारतेय, आपण खरचं जगतोय का? डेन्मार्क ओपनमध्ये भारताचे प्रतिनिधित्व न करणे ही शेवटची वेळ होती. सध्याच्या नकारात्मक भावनेतून आणि अनिश्चिततेतून मी निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.''