नवी दिल्ली- निवृत्त न्यायमूर्ती एम. शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील १२ सदस्यांच्या समितीने शनिवारी अर्जुन पुरस्कारासह राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली. या पुरस्कार यादीत भारताचा बॅडमिंटनपटू एच.एस. प्रणॉयचे नाव नाही. यामुळे प्रणॉय भडकला असून त्याने, पुरस्कार मिळवण्यासाठी तुमचा वशिला पाहिजे. जो तुमच्या कामगिरीपेक्षा तुमच्या नावाला पुढे करतो, असे सांगत त्याने समितीवरच गंभीर आरोप केले आहेत.
भारतीय बॅडमिंटन संघाने प्रणॉयशिवाय बी साई प्रणीत, मनु अत्री यांच्या नावाची शिफारस केली होती. पंरतु, यामध्ये फक्त एका प्रणीतला अर्जून पुरस्कारासाठी निवडण्यात आले. यामुळे प्रणॉय भडकला आहे. त्याने आपली भडास ट्विट करत काढली.
'तुम्हाला जर पुरस्कार मिळावे असे जर वाटत असेल तर तुमच्याकडे पुरस्काराची शिफारस करणारे लोक हवीत. ते तुमचे नाव त्या यादीत टाकू शकतील. आपल्या देशात कामगिरीला महत्व दिले जात नाही. महत्वाच म्हणजे, यावर आपण काही बोलू शकत नाही याचे वाईट वाटते.' असा आशयाचे ट्विट प्रणॉयने केले आहे.
कोण आहे प्रणॉय -
एचएस प्रणॉय हा भारतीय बॅडमिंटनपटू असून त्याने २०१८ मध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच त्याने आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत एकेरीत कास्य पदक जिंकले आहे.
या खेळाडूंना अर्जुन पुरस्कार -
रवींद्र जडेजा (क्रिकेट), पूनम यादव (क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान (हॉकी), तजिंदरपाल सिंग तूर (अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया (अॅथलिट), एस. भास्करन (बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर (बॉक्सिंग), अजय ठाकूर (कबड्डी), गौरव सिंग गिल (मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत (पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील (शूटींग), हरमित राजुल देसाई (टेबल टेनिस), पूजा धांडा (कुस्ती), फॉदा मिर्झा (इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू (फुटबॉल), स्वप्ना बर्मन (अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर (पॅरा अॅथलिट), बी. साई प्रणित (बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल (पोलो)