मुंबई- क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्यात न आल्याने, भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय प्रचंड नाराज झाला आहे. प्रणॉयने त्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेला खडेबोल सुनावले आहेत.
प्रणॉय म्हणाला, 'अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत पदके जिंकलेल्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. ज्या खेळाडूंनी मोठ्या स्पर्धामध्ये यश मिळवलेले नाही, अशा खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाते. देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ही हास्यास्पद बाब आहे.'
भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपने प्रणॉयची पाठराखण केली आहे. पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी कोणते निकष वापरण्यात येतात, ते कळत नसल्याचे सांगत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे, असे त्याने म्हटले आहे. पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करताना खेळाडूंची मागील चार वर्षांतील कामगिरी पाहण्यात येते, असे क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे.