मुंबई- इंग्लंडमध्ये नुकतीच ऑल इंग्लंड बॅडमिंटन चॅम्पियनिशीप स्पर्धा पार पडली. यात तैवानच्या संघासोबत सरावासाठी असलेल्या दहा वर्षीय खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. यामुळे स्पर्धेत सहभागी झालेली भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू व तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतात परतल्यानंतर होम क्वारंटाइन स्वीकारला आहे.
बर्मिंगहॅममध्ये मागील आठवड्यात झालेल्या या स्पर्धेत सिंधू, सायना, किदाम्बी श्रीकांतसह भारताचे आणखी काही बॅडमिंटनपटू सहभागी झाले होते, मात्र या स्पर्धेत तैवान संघासोबत असलेल्या ज्युनियर खेळाडूला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. यामुळे सिंधु आणि गोपीचंद यांनी खबरदारी म्हणून होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे.
सिंधूचे वडील पी. व्ही. रमन्ना म्हणाले की, 'कोरोना विषाणूच्या फैलावामुळे इंग्लंडहून परतल्यावर मी, सिंधू आणि गोपीचंद स्वतःहून होम क्वारंटाइन झालो. आम्ही १४ दिवस कोणालाच भेटणार नाही. सिंधू टेरेसवरच व्यायाम करते व घराजवळच जॉगिंग करते. खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही आम्ही हा निर्णय घेतला आहे.'