नवी दिल्ली - ७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या थॉमस अँड उबर कपचे शिबिर रद्द केले गेले असून या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असल्याची माहिती बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने (बीएआय) दिली आहे. ७ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीचा वेळ मिळत नसल्याने हे शिबिर रद्द करण्यात आले. त्याशिवाय स्पर्धेसाठी संघ निवडण्याची अंतिम तारीख १७ सप्टेंबर होती, असे बीएआयने सांगितले.
बीएआयचे सरचिटणीस अजय कुमार सिंघानिया म्हणाले, "भारतीय क्रीडा प्राधिकरणासह (एसएआय) सर्व भागधारकांशी बरीच चर्चा झाल्यानंतर आम्ही हे शिबिर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे." हैदराबादच्या गोपीचंद अकादमी येथे हे शिबिर होणार होते.
सिंघानिया पुढे म्हणाले, "एसओपी लागू करून आणि क्वारंटाइन नियमांचे पालन केल्यानंतर शिबिरासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. म्हणूनच राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्यासह पाच निवडकर्त्यांसमवेत हा निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही संघाची निवड केली असून हा संघ डेन्मार्कमधील दोन स्पर्धांव्यतिरिक्त थॉमस आणि उबर कपमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करेल."
थॉमस कप संघाचे नेतृत्व पुरुष खेळाडू किदाम्बी श्रीकांत करणार आहे. त्यांच्या व्यतिरिक्त या संघात पारुपल्ली कश्यप, लक्ष्य सेन आहेत. दुहेरीत मनु अत्र आणि बी. सुमित रेड्डी यांच्यावर मदार आहे. तर, उबर कपमध्ये सायना नेहवाल आणि पी.व्ही. सिंधू भारताला बळकटी देतील.
- थॉमस कपसाठी संघ - किदाम्बी श्रीकांत, पारूपल्ली कश्यप, लक्ष्य सेन, शुभंकर डे, सिरिल वर्मा, मनु अत्र, बी.सी. सुमित रेड्डी, एमआर अर्जुन, ध्रप कपिला, कृष्णा प्रसाद गारगा.
- उबर कपसाठी संघ - पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल, आकर्शी कश्यप, मालविका बनसोडे, अश्विनी पोनप्पा, एन. सिक्की रेड्डी, पूजा दांडू, संजना संतोष, पूर्वाविश एस. राम, जक्कमपुडी मेघना.