बँकॉक -बीडब्ल्यूएफच्या ताज्या जागतिक क्रमवारीत भारताची सात्त्विकसाईराज रंकीरेड्डी आणि अश्विनी पोनप्पा यांची मिश्र दुहेरीची जोडी टॉप-२०मध्ये पोहोचली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या ताज्या क्रमवारीत अश्विनी-सात्त्विकसाईराज या जोडीने १६ स्थानांची झेप घेत १९वे स्थान पटकावले. या क्रमवारीत चीनची जोडी झेंग सिवेई आणि हुआंग याकियॉंग अव्वल स्थानावर आहे.
सात्त्विकसाईराज आणि अश्विनी जोडीने जागतिक मालिकेतील सुपर १००० दर्जाच्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. हे यश मिळवणारी ही भारताची पहिली मिश्र दुहेरीतील जोडी ठरली होती. तर, पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांतने १३वे स्थान गाठले आहे. समीर वर्माने चार स्थानांनी सुधारणा करीत २७वे स्थान गाठले आहे. बी. साईप्रणितची १७व्या स्थानावर घसरण झाली आहे. पारुपल्ली कश्यप २६व्या स्थानावर आहे.