मुंबई -कुठलीही गोष्ट विदेशी असली की ती चांगलीच असते हे अमेरिकन मार्केटिंग कंपन्यांनी आपल्या भारतीयांच्या मनावर कोरले आहे. त्यात व्हॅलेंटाईन डे सेलिब्रेशन सुद्धा आलं. कोण तो व्हॅलेंटाईन आणि कसला प्रेमाचा दिवस? परंतु सगळं जग साजरी करते म्हणून आपणही करतो. असो. या व्हॅलेंटाइन्स डे च्या सेलेब्रेशन मध्ये ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ चे निखिल दामले व गौरी कुलकर्णी आणि ‘तुझं माझं जमतंय’ मधील मोनिका बागुल व रोहन विचारे या तरुण कलाकारांनी व्हॅलेंटाइन्स डे च्या शुभेच्छा पाठविल्या आहेत.
झी युवा मालिकांमधील कलाकांरांकडून हॅपी व्हॅलेंटाईन डे झी युवा वरील ‘तुझं माझं जमतंय’ मधील रोहन विचारे म्हणतो की ‘प्रेम वगैरे व्यक्त करायला स्पेशल दिवसाची गरज नाहीये, ते रोजच व्यक्त करता येतं. प्रेम ही इतकी सुंदर भावना आहे ती कधीही व्यक्त करता येते. मी १५-१६ तास शूट करत असतो तरीही मी जिच्यावर प्रेम करतो तिला हवा असलेला वेळ देतो. ती कोण? ती माझी ‘जिम’. माझं माझ्या ‘जिम’ वर खूप प्रेम आहे. मला वर्कआउट करायला आवडतं आणि व्हॅलेंटाइन्स डे सुद्धा मी ‘जिम’ सोबतच असणार आहे. तुम्हा सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन्स डे’. याच मालिकेत आशूची व्यक्तिरेखा साकारणारी मोनिका बागुल म्हणाली, ‘व्हॅलेंटाइन्स डे म्हणजेच प्रेम दिवसाबाबत बोलायचं झालं तर माझ्या मालिकेतील व्यक्तिरेखेप्रमाणेच माझेही मत आहे की प्रेम व्यक्त करायला खास दिवसाची गरज नसावी. हा व्हॅलेंटाइन्स डे मी ‘आशू’ सोबत म्हणजे माझ्यासोबतच साजरा करणार आहे. सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन्स डे.’ ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही मालिका झी युवा वाहिनीवर प्रसारित होते व तिला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. यात सईची भूमिका करणारी गौरी कुलकर्णी म्हणाली, ‘व्हॅलेंटाइन्स डे किंवा प्रेम दिवस हा प्रेम वाटण्याचा दिवस. ते आपण नेहमीच वाटत असतो. बघूया या वर्षीचा माझा व्हॅलेंटाइन्स डे कसा असेल ते. शूट असेल तर सेटवर आणि सुट्टी असेल तर मित्रमैत्रिणींबरोबर एन्जॉय करणार. तुम्हा सर्वांना हॅपी व्हॅलेंटाइन्स डे.’ याच मालिकेतील सईच्या एनआरआय प्रियकराची, नचिकेत देशपांडेची भूमिका निभावणारा निखिल दामले व्यक्त झाला. ‘या दिवशी प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेंड आहे. खरंतर ते कधीही व्यक्त करता येऊ शकते या मताचा मी आहे. त्या दिवशी मी शूट करीत असेन वा घरी असेन, एकटाच असेन. ज्यांना या दिवसाची महती आहे त्यांना हॅपी व्हॅलेंटाइन्स डे.’एकंदरीत पाहता या कलाकारांना व्हॅलेंटाइन्स डे बद्दल फारसा उत्साह दिसत नाहीये किंवा त्यांना आपल्या ‘व्हॅलेंटाईन’ चे नाव उघडपणे सांगायचे नाही. एनीवेज, हॅपी व्हॅलेंटाइन्स डे!