मुंबई -बॉलिवूडमध्ये सध्या बायोपिकचा ट्रेण्ड सुरू आहे. अनेक बायोपिक आत्तापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले. चित्रपटांद्वारे राजकीय प्रचाराचाही फंडा या बायोपिकमधून पाहायला मिळतो आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावरही बायोपिक तयार करण्यात येत आहे. यामध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय हा मोदींच्या भूमिकेत झळकणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या बायोपिकच्या शुटिंगला सुरुवात झाली आहे. यामध्ये नरेंद्र मोदी यांच्या जवळच्या व्यक्ती म्हणजे त्यांच्या आईची भूमिका कोण साकारणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. त्यांच्या पत्नीची भूमिका कोण साकारणार त्याचाही उलगडा झाला आहे.
अभिनेत्री जरीना वहाब नरेंद्र मोदींच्या आईच्या भूमिकेत झळकणार आहे. तर, त्यांच्या पत्नीच्या भूमिका बरखा बिस्ट सेनगुप्ता ही अभिनेत्री साकारणार आहे. या चित्रपटातील या दोघींच्या पहिल्या लूकचे पोस्टर शेअर करण्यात आले आहे. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी हे पोस्टर शेअर करून याबाबत माहिती दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा फर्स्ट लूक लॉन्च करण्यात आला. गुजरात, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही ठिकाणी या बायोपिकचे शूटिंग होणार आहे.
भाजपचे अध्यक्ष अमीत शाह यांच्या भूमिकेत अभिनेता मनोज जोशी दिसणार आहेत. या बायोपिकचे दिग्दर्शन ओमंग कुमार हे करत आहेत. त्यांनी यापूर्वी 'सरबजीत' आणि 'मेरी कॉम' हे बायोपिक तयार केले आहेत. बॉक्स ऑफिसवर या दोन्हीही चित्रपटांना चांगला प्रतिसाद मिळाला होता. आता 'पीएम मोदी' बायोपीकला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.