महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

पुण्यातील युवकांनी रस्त्यांवर येऊन ‘मनी हाईस्ट' स्टाईलने लस घेण्याचं केले आवाहन! - लोकप्रिय वेब सिरीज मनी हाईस्ट

गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेबसिरीज 'मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत. ‘मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये 'लस घ्या लस घ्या' हे गाणं गाताना हे तरुण दिसतात. नेहमीच डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपलं वेगळेपण जपणाऱ्या खास रे टीमने यावेळी वेगळी थीम वापरून लस घेण्याचं आवाहन केलं आहे.

‘मनी हाईस्ट' स्टाईलने लसीकरणाबद्दल जनजागृती
‘मनी हाईस्ट' स्टाईलने लसीकरणाबद्दल जनजागृती

By

Published : Sep 7, 2021, 7:12 PM IST

गेल्यावर्षी लॉकडाऊनच्या काळात लोकांना घरी बसावे लागले होते. घराबाहेर पडण्यास सरकारने सक्त मनाई केली होती त्यामुळे लोकांनी मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमांकडे मोर्चा वळविला होता. चित्रपटगृहे बंद असल्यामुळे व मालिकांचे नवीन भाग प्रसारित होऊ शकत नसल्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सुगीचे दिवस आले होते किंबहुना अजूनही तोच ट्रेंड सुरु आहे. या काळात स्पॅनिश मालिका ‘मनी हाईस्ट' भारतात फेमस झाली. तशी ती जगभरात प्रसिद्ध आहे आणि भारतीयांनीही या सिरीज ला डोक्यावर घेतले. त्याचे ४ सीझन्स मधील साधारण तासाभराचे ५०-६० भाग पाहून प्रेक्षकांचे मन भरले नाही म्हणून मेकर्सनी पुढील सिझन आणला.

'मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन

तर, ‘मनी हाईस्ट'चा ५ व्या सीझनमधील काही भाग नुकतेच प्रदर्शित झाले असून उर्वरित यावर्षीच्या शेवटाला प्रेक्षकांच्या भेटीला येतील. आता तुम्ही म्हणाल ‘मनी हाईस्ट' या सिरीजचे इतके गुणगान का गेले जातेय. तर, सर्व वयोगटातील, युवकांमध्ये खास, प्रेक्षकांना या मालिकेची प्रचंड भुरळ पडलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील रस्त्यांवर काही तरुण फेमस वेबसिरीज 'मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये नागरिकांना लस घेण्याचे आवाहन करताना दिसतायेत. पुणेकरांना हे प्रश्न सतावतोय की हे पथनाट्य आहे का? हे तरुण कोण आहेत? ही कुठली सामाजिक संस्था आहे का? त्यांचे व्हिडिओजही गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेत. हे युवक कोण आहे यावरून आता पडदा उठला असून ही आहे टीम 'खास रे', ‘मनी हाईस्ट'च्या गेटअपमध्ये 'लस घ्या लस घ्या' हे गाणं गाताना पुणे पालथे घालतेय.

'लस घ्या लस घ्या' हे गाणं लवकरच डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

आधी हे नेमकं काय चाललंय अशा आर्विभावात असलेल्या पुणेकरांनी नंतर मात्र हा माहौल एन्जॉय केला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे असलेला लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर गजबजलेल्या पुण्यातील रस्त्यांवर अचानक काही युवकांनी येऊन फिल्मी स्टाईलने लस घेण्याचं आवाहन करण्यास सुरुवात केली. नागरिक अजूनही गाफील आहेत, नियमांचे काटेकोर पालन करत नाहीयेत, तसेच लसीबद्दल ही वेगवेगळे संभ्रम पसरविले जातायेत. त्यामुळे नागरिकांची मनोरंजनात्मक पध्दतीने जनजागृती करण्यासाठी हे गाणं केल्याचं टीम 'खास रे' आणि निर्माते नरेंद्र फिरोदिया यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय.

नेहमीच डिजीटल प्लॅटफॉर्मवर आपलं वेगळेपण जपणाऱ्या खास रे टीमने यावेळी वेगळी थीम वापरून लस घेण्याचं आवाहन केलं आहे. गाण्याची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन संजय श्रीधरचं असून संदेश कालेकरनं संगीत बद्ध केलेल़ं हे गाणं निरंजन पेडगावकरनं गायलं आहे. 'लस घ्या लस घ्या' हे गाणं लवकरच 'खास रे'च्या डिजीटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - सलमान, अक्षय, फरहानसह 38 दिग्गज सेलेब्रिटींना अटक करण्याची मागणी

ABOUT THE AUTHOR

...view details