मुंबई - विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या रायसंबधी केलेले ट्विट डिलीट करून जाहिर माफी मागीतली आहे. एक्झिट पोलचा संदर्भ देत ऐश्वर्या रायच्या वैयक्तिक आयुष्यावर असलेले एक मीम त्याने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले होते. या ट्विटनंतर सोशल मीडियामध्ये वादंग निर्माण झाले होते.
विवेकच्या ट्विटनंतर अभिनेत्री सोनम कपूर तसेच सोशल मीडिया युझर्सनी विवेकला धारेवर धरले होते. अमिताभ बच्चन यांनीही अप्रत्यक्षरित्या विवेकला सोशल मीडियावरून फटकारले. अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनीही सोशल मीडियावर विवेकचे हे ट्विट अत्यंत लाजिरवाणे असल्याचे म्हटले होते. तसेच राज्य महिला आयोगानेही या ट्विटची दखल घेत विवेकला नोटीस बजावली होती.
सुरुवातीला माफी मागण्यास साफ नकार देणाऱ्या विवेकने 'आधी मी काय चुकीचे केले ते सांगा, नंतर माफी मागतो', अशी भूमिका घेतल्यानंतर पुन्हा तो सोशल मीडियावर ट्रोल होऊ लागला. यामुळे विवेकने आता ते ट्विटच डिलीट करून सर्वांची माफी मागीतली आहे.