कोरोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचा धोका जरी दिसत असला तरी मनोरंजनसृष्टीतील कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होताना दिसताहेत. चित्रपटगृहे सुरु झाली आणि प्रेक्षकांची बऱ्यापैकी गर्दी होऊ लागली आहे. तसेच नाट्यगृह सुरू झाल्यापासून नाटकं बघण्यासाठीही गर्दी होऊ लागली आहे. नाट्यगृहांत अनेक सांगितीक कार्यक्रमांची रेलचेल दिसून येत आहे. सुप्रसिद्ध गायिका योगिता बोराटे आणि 'स्वरमेघा क्रिएशन' प्रस्तुत ‘प्रेमरंग’ हा सांगीतिक कार्यक्रम लवकरच होत असून त्या कार्यक्रमाला बिग बॉस' या रिॲलिटी शोचा ‘आवाज’ विजय विक्रम सिंग प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावणार आहेत. ‘प्रेमरंग’ या कार्यक्रमाचे पोस्टर सोशल मीडियावर नुकतच शेअर करण्यात आलं.
गायिका योगिता बोराटे गेली २५ वर्ष संगीतक्षेत्रात कार्यरत आहेत. त्या 'स्वरमेघा क्रिएशन्सच्या' संस्थापिका असून 'स्वरमेघा म्युझिक' अकॅडमीही चालवितात. स्वरमेघा क्रिएशन्सच्या अंतर्गत त्यांनी याआधी ६ संगीत कार्यक्रम केलेले आहेत. तर याआधी त्यांची 'दिल लगी ये तेरी' आणि 'हम हात जोडे दोनो' ही ओरिजनल हिंदी गाणी तसेच 'घोर अंधारी रे' हे गुजराती गाणं प्रसिद्ध आहे. भारतातच नव्हे तर भारताबाहेर त्यांनी अनेक संगीत कार्यक्रम केले आहेत. युगांडा तसेच लंडनमध्ये देखील त्यांनी संगीत कार्यक्रम केलेले आहेत.