मुंबई- 'माहेरची साडी' हा सिनेमा ज्या चित्रपटगृहात ७० आठवडे चालला ते चित्रा थिएटर ७० व्या वर्षीच बंद पडणं दुर्दैवी असल्याचं मत माहेरची साडी सिनेमाचे निर्माते आणि दिग्दर्शक विजय कोंडके यांनी व्यक्त केलं. 'माहेरची साडी' हा सिनेमा सर्वप्रथम सातारा, सांगली, इचलकरंजी या भागात रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर तो पुण्यात रिलीज करण्यात आला.
हा सिनेमा सगळ्याच ठिकाणी मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतल्यामुळे मुंबईत तो रिलीज करण्याचा विचार कोंडके यांच्या डोक्यात सुरू झाला. मात्र त्यावेळी प्लाझा थिएटर सलग फक्त चार आठवड्यांसाठी मराठी सिनेमाला मिळत असे. तर शारदा, हिंदमाता यासारखी थिएटर्स तेवढ्या चांगल्या अवस्थेत राहिली नव्हती. त्याचवेळी चित्रा थिएटर ज्यांच्याकडे चालवायला होतं त्यांनी मॉर्निंग शोज लावून लावून ते पुरत बदनाम करून टाकलं होतं. अशात तिथे मराठी सिनेमाचा शो लावणं म्हणजे आत्महत्या करण्यासारखं होतं.
'चित्रा' बंद पडणं दुर्दैवी, विजय कोंडकेंची प्रतिक्रिया मात्र कोंडके यांनी याच थिएटरमध्ये माहेरची साडी लावण्याचा निर्णय घेतला. सगळ्यात आधी थिएटर चालवणाऱ्याशी करार केला. त्यानंतर थिएटर ताब्यात घेऊन ते संपूर्णपणे साबणाच्या पाण्याने धुवून काढलं. त्यानंतर सिनेमाची जाहिरात करणाऱ्या गुरुजी बंधू यांच्याकडून थिएटरची नव्याने रंगरंगोटी करून घेतली. सिनेमाची पोस्टर बॅनर्स लावून थिएटर सजवून टाकलं. एवढंच नाही, तर संपूर्ण थिएटरला लायटिंगच्या माळा लावून हा सिनेमा तिथे थाटात रिलीज केला. त्यानंतर प्रेक्षकांनी हा सिनेमा आणि थिएटर, असं काही डोक्यावर घेतलं की पुढचे ७० आठवडे हा सिनेमा या थिएटरवरून खाली उतरला नाही.
त्या काळात बेस्ट बसचे कंडक्टर चित्रा सिनेमाचा स्टॉप आल्यावर घंटी वाजवून चला 'माहेरची साडी' स्टॉप आला असं म्हणायचे, अशी आठवण कोंडके यांनी मोठ्या अभिमानाने सांगितली. अखेर बाबरी मशीद पडल्यामुळे मुंबईसह देशभरातील वातावरण बदललं आणि दंगली सुरू झाल्यामुळे इतर सिनेमांप्रमाणेच हा सिनेमा थिएटरमधून उतरला. मात्र माहेरची साडी आणि चित्रा सिनेमा हे समीकरण प्रेक्षकांच्या हृदयात घट्ट बसलं ते कायमचं. काळाच्या ओघात शारदा, हिंदमाता आणि आता चित्रा ही मराठी बहुल भागातली थिएटर्स बंद पडली. त्यासोबत सिनेमाच्या निमित्ताने मराठी सिनेसंस्कृतीचा असलेला वारसाही निखळला तो कायमचाच.