महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sitara

‘रामायण’ मालिकेतील प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन, "रामा"नेही व्यक्त केले दुःख - ‘रामायण’ मालिकेतील 'आर्य सुमंत'

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेतेा चंद्रशेखर यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले. ते काही काळ आजारी होते व त्यांचे बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानीच निधन झाले. ‘रामायण’ मालिकेतील आर्य सुमंत ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती.

chandrasekhar-passes-away
अभिनेता चंद्रशेखर कालवश

By

Published : Jun 16, 2021, 4:06 PM IST

Updated : Jun 16, 2021, 4:58 PM IST

जवळपास २५० चित्रपटांतून काम केलेले बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते चंद्रशेखर यांचे वयाच्या ९७व्या वर्षी निधन झाले. ते काही काळ आजारी होते व त्यांचे बुधवारी सकाळी आपल्या निवासस्थानीच निधन झाले. त्यांचे पुत्र प्राध्यापक अशोक चंद्रशेखर म्हणाले की ‘मुंबईच्या विलेपार्ले स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. गेल्या गुरुवारी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते आणि एका दिवसाने त्यांना घरीसुद्धा आणले होते. त्यांच्यासाठी आम्ही ऑक्सिजनसह सर्व सुविधा तयार ठेवल्या होत्या. अगदी काल रात्रीपर्यंत ते ठीक होते. त्यांचा शेवट झोपेतच आणि शांततापूर्ण झाला.’

अभिनेता चंद्रशेखर कालवश

चंद्रशेखर वैद्य यांनी चित्रपटातसोबत टेलिव्हिजन मालिकांतूनही अभिनय केला होता. ‘रामायण’ मालिकेतील आर्य सुमंत ही त्यांची भूमिका विशेष गाजली होती. ‘रामायण’ मध्ये रामाची भूमिका साकारणारे अरुण गोविल यांनीसुद्धा खेद व्यक्त केलाय.

चंद्रशेखर यांनी १९५३ ला ‘सुरंग’ या चित्रपटातून नायकाची भूमिका केली होती जो व्ही शांताराम यांनी बनविला होता. ‘चा चा चा’ या पाश्चिमात्य नृत्यसंस्कृतीवर आधारित चित्रपटात चंद्रशेखर आणि हेलन ही जोडी होती. चंद्रशेखर यांनी त्याकाळी विलायतेत जाऊन पाश्चिमात्य नृत्याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण घेतले होते आणि डिग्री सुद्धा मिळविली होती. त्यांच्यामुळेच बॉलिवूडमध्ये पाश्चिमात्य नृत्यसंस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला. ६०-७० च्या दशकातील अनेक हिंदी गाण्यांतून याचा प्रत्यय येतो.

चंद्रशेखर यांनी १९५३ ला ‘सुरंग’ या चित्रपटातून नायकाची भूमिका केली होती

चंद्रशेखर यांनी नंतर चरित्र भूमिकांकडे मोर्चा वळविला आणि कन्यादान, मस्ताना, काली टोपी लाल रुमाल, रुस्तम-ए-बगदाद, बरसात की रात, बसंत बहार सारख्या अनेक चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारल्या. दोनेक दशकांपूर्वी ते शेवटचे ‘खौफ’ या चित्रपटात दिसले होते. व्ही. शांताराम, मा. भगवान, बी.आर. चोप्रा, मनमोहन देसाई, प्रकाश मेहरा, शक्ती सामंता, रामानंद सागर यांच्यासह त्यांनी त्या काळातील बहुतेक सर्वच प्रमुख दिग्दर्शकांसोबत काम केले. आघाडीचे अभिनेते दिलीप कुमार, देव आनंद, भारत भूषण, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन आणि इतर अनेक स्टार्ससोबत त्यांनी स्क्रीन शेयर केला होता.

अभिनेता चंद्रशेखर कालवश

चंद्रशेखर यांनी १९८५ ते १९९६ या काळात (CINTAA) सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोशिएशन चे अध्यक्षपद भूषविले होते आणि सिंटा च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. चंद्रशेखर यांनी सिंटा च्या सभासदांसाठीच्या गृहसंकुलासाठी शासनाकडे साकडे घातले होते. ते गृहसंकुल पूर्णत्वाच्या मार्गावर असून त्याचे उदघाटन चंद्रशेखर यांच्याहस्ते करण्याचा सिंटा च्या पदाधिकाऱ्यांचा मानस होता.

टीव्हीचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती अरोरा याचे चंद्रशेखर हे आजोबा आहेत. चंद्रशेखर यांच्या कुटुंबियांच्या दुःखात ‘ईटीव्ही भारत मराठी’ सहभागी आहे.

हेही वाचा - आपल्या मनमोहक सौंदर्याने पर्यटकांना आकर्षीत करणारे ट्यूलीप गार्डन

Last Updated : Jun 16, 2021, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details