कोरोनाचा आघात होण्याआधी मनुष्य नुसता धावत होता. तरुण पिढी तर रोजच्या स्पर्धेमुळे जास्तच धावपळ करीत होती. परंतु कोरोना महामारीमुळे या वेगाला लगाम घातला गेलाय. परंतु त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्यात तर काही लोकांना पगार कपात करून घेऊन काम करावे लागतेय. त्यामुळेच हल्लीचे करिअर ओरिएंटेड कपल्स घरी सुद्धा ऑफिस घेऊन येतात. दिवसभर ऑफिसमध्ये केलेली कामे, तिथले ताणतणाव, चिडचिड, बॉस, सहकाऱ्यांसोबतचे संवाद अशा अनेक गोष्टी ऑफिस सुटल्यावर घरी सुद्धा येतात.
त्यामुळे होतं काय की संपूर्ण आयुष्यच ऑफिस-एके-ऑफिसमय होऊन जातंय. अनेकदा घरी आल्यावरही आपल्या पार्टनरसोबत त्याच्याच चर्चा रंगतात. नवरा बायकोच्या हेल्दी रिलेशनशीपसाठी हे कधी नुकसान करणारेही ठरू शकते. याच गोष्टी कधी कधी भांडणासाठी कारणीभूत ठरतात. यात बदल होणं अपेक्षित आहे. म्हणूनच या चर्चा टाळून एकमेकांना वेळ देत आपण आपले नाते अधिकच दृढ करू शकतो हे दिग्दर्शक वरूण नार्वेकर याने 'आणि काय हवं'च्या तिसऱ्या सिझन मध्ये दाखविण्याचा प्रयत्न केलाय.
'आणि काय हवं'च्या पहिल्या आणि दुसऱ्या सिझनला प्रेक्षकांनी भरपूर प्रेम दिले. हल्लीच्या कपल्सचे प्रतिनिधित्व करणारे जुई आणि साकेत बघताबघता घराघरात पोहोचले. अनेकांना त्यांच्यात आपले प्रतिबिंब दिसते. प्रेक्षकांच्या याच प्रेमामुळे आता 'आणि काय हवं'चा तिसरा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘आणि काय हवं ३' मध्ये जुई आणि साकेतचे नाते होणार अधिकच दृढ होणार आहे.