‘आई कुठे काय करते’ मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळत आहे आणि या प्रतिसादामुळेच मालिकेने २५० भागांचा टप्पा नुकताच गाठला होता. स्टार प्रवाहवरील हीच प्रेक्षकप्रिय मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचली आहे. अनिरुद्ध आणि अरुंधतीच्या घटस्फोटासाठी अवघे काही दिवस उरलेले असताना आता अनिरुद्धला अरुंधतीसोबत घटस्फोट घ्यायचा नाहीय. आप्पांकडे त्याने तसं बोलूनही दाखवलं आहे. संजनाशी लग्न न करण्याचा अनिरुद्धचा निर्णय आणि अभिषेकनेही अंकिताला सक्त ताकीद दिलीय ही वळणं प्रेक्षकांची उत्कंठा वाढविणारी आहेत.
द्विधा मनस्थितीत अडकलेल्या अनिरुद्धला आता संजनाशी लग्नही करायचं नाहीय. अनिरुद्धच्या या निर्णयामुळे अरुंधती आणि संजनाच्या आयुष्यात नवा संभ्रम निर्माण झाला आहे. अनिरुद्धच्या या निर्णयाचे नेमके काय पडसाद उमटणार याची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. एकीकडे अनिरुद्धचं दुटप्पी धोरण तर तिकडे अभिषेक आणि अंकिताच्या नात्यातही कडवटपणा पाहायला मिळतोय.