एकल कुटुंबपद्धतीच्या आग्रहामुळे सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे किंबहुना लोप पावली आहे. प्रत्येक कुटुंबपद्धतीचे फायदे आणि तोटे असले तरी एकत्र कुटुंबपद्धतीमध्ये मात्र कठीण काळात आधार मिळण्याची शाश्वती असते. परंतु व्यक्तिस्वातंत्र्याच्या प्रभावाखाली फोफावलेली एकल कुटुंबपद्धती माणसांना नैराश्याच्या अधीन करण्याची शक्यता अधिक असते. असो. विभक्त कुटुंब पद्धती फोफावत असताना पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीला नवसंजीवनी देणारी मालिका म्हणजे ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं’.
या मालिकेतील एकत्र कुटुंब पद्धती आणि एकंदरीतच देशमुख कुटुंबातील सदस्यांची एकमेकांबद्दलच नाही तर त्यांच्याकडील पशु-पक्षांबद्दल देखील असलेली आत्मीयता प्रेक्षकांना भावली आहे आणि त्यामुळेच या मालिकेला प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतोय. यात प्रेक्षकांचा लाडका ‘राणादा’ पुन्हा त्यांच्या भेटीला आलाय, एका वेगळ्या रूपात. झी मराठीवरील प्रेक्षकांची लोकप्रिय आणि कायम लक्षात राहील अशी व्यक्तिरेखा म्हणजे राणा दा. हा राणा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आता सिद्धार्थ देशमुख या नव्या व्यक्तिरेखेसह तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे.
ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली असली तरी प्रेक्षकांचा या मालिकेला भरगोस प्रतिसाद मिळतोय. नुकतंच मालिकेत ऐश्वर्या म्हणजेच देशमुख घरातील म्हशीच बाळंतपण प्रेक्षकांनी पाहिलं. ऐश्वर्या बाळंत होणार, म्हणून घरातील सगळेचजण काळजीत असतात. प्रत्येकाची सुरु असलेली धावपळ बघून ऐश्वर्या म्हैस आहे की मुलगी यात अदितीचा गोंधळ होतो. दिवसाअंती म्हैस बाळंतपण सुखरूप पार पडतं आणि सगळेच टेन्शन फ्री होतात. त्यामुळे देशमुख कुटुंब हे फक्त माणसांपुरती मर्यादित नसून त्या घरातील पशु-पक्षी देखील त्यांचं कुटुंबच आहे असं सिद्धार्थ अदितीला सांगतो.