मुंबई - भारत आणि चीन यांच्या सीमावादामुळे चीनच्या ५९ अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे. यामध्ये लोकप्रिय अॅप टिक टॉकचाही समावेश आहे. टिक टॉकवर बंदी घातल्यामुळे खासदार नुसरत जहाँ यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.
नुसरत म्हणाल्या, ''टॉक हे मनोरंजन अॅप आहे. हा आवेशांत घेण्यात आलेला निर्णय आहे. रणनितीची योजना काय आहे? त्या लोकांचे काय जे यामुळे बेरोजगार होतील? लोकांना नोटबंदीप्रमाणे हेदेखील सहन करावे लागेल. बंदीमुळे मला काही प्रॉब्लेम नाही, कारण हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. परंतु या काही प्रश्नांची उत्तरे कोण देणार?''
कोलकाता येथे पार पडलेल्या इस्कॉनच्या उल्टा रथ यात्रा सोहळ्यात नुसरत जहाँ सहभागी झाल्या होत्या. यावेळी त्यानी या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. नुसरत या बंगाली अभिनेत्री आहेत. आपल्या विधानांमुळे त्या नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या या विधानावर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. काहीजण त्यांची प्रतिक्रिया संतुलित असल्याचे म्हणत आहेत, तर काहीजण कौतुक करीत आहेत. टिक टॉकवरील रोजगाराची लोक टरही उडवीत आहेत.
हेही वाचा - वैश्विक एकात्मतेचा संदेश देणारं गायक महेश काळेचं गाणं ‘विठ्ठला..!’
मंगळवारी पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले होते की, ''चीनी अॅप्सवर बंदी घालणे योग्य नाही. आपल्याला चीनला उत्तर द्यायचे आहे आणि आम्ही हे कसे करणार हे सरकारने ठरवायचे आहे.''