‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका म्हणजेच दिलदार प्रेमाची ही वजनदार गोष्ट बघता बघता अवघ्या महाराष्ट्राच्या पसंतीस उतरली. ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका अतिशय नाजूक विषयावर आधारलेली असून या मालिकेद्वारे लठ्ठपणाचा मुद्दा अत्यंत हळूवारपणे हाताळण्याचा प्रयत्न केला गेला आहे. स्त्री-पुरुष समानतेच्या आधुनिक काळातही मुलींच्या वाट्याला बाह्यरूपामुळे नकार येतो. या मालिकेमुळे लोकांचा सौंदर्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायला कुठेतरी हळूहळू सुरुवात होईल अशीच इच्छा आहे.
आपल्या समाजातील वेगळं भावविश्व दाखवणारी, सुंदर असणं म्हणजे नक्की काय, याचा पुन्हा एकदा विचार कारायला भाग पाडणारी सुंदरा म्हणजेच लतिका महाराष्ट्रातील प्रत्येक प्रेक्षकाच्या मनामध्ये भरली, प्रेक्षकांनी मालिकेला उदंड प्रतिसाद दिला आणि अजूनही देत आहेत. आता हीच ‘सुंदरा’ झालीय एका वर्षाची. थोडक्यात सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेची “वर्षपूर्ती” झाली आहे.
क्षणात मनामध्ये भरते ते रूप, सहवासाने भरते ते स्वरूप. अगदी असंच या मालिकेमध्ये होताना दिसू लागलं आहे. अभिचं मन सुंदराने म्हणजेच प्रेक्षकांच्या लाडक्या लतिकाने जिंकलं आहे ते तिच्या समजूतदारपणामुळे आणि स्वभावामुळे. पण, लतिका अभिचं प्रेम स्वीकारेल की नाही हे जाणून घेण्यासाठी अवघा महाराष्ट्र आतुर आहे. मालिकेतील सगळ्याच पात्रांनी म्हणजेच लतिका, अभिमन्यू, इंदू, सज्जनराव, दौलत, बापू (लतिकाचे वडील), लतिकाची आई, मिस नाशिक, हेमा, आशुदादा संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली. मधुगंधा कुलकर्णी यांनी अतिशय सुंदररित्या कथेची मांडणी केली आहे. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती स्ट्रॉबेरी पिक्चर्सने (मनवा नाईक) केली आहे.