मुंबई- नेहमीच्या मालिकांसोबतच छोट्या पडद्यावर रियालिटी शोजसुद्धा खूप बघितले जातात. नृत्य, अभिनय, गायन ई. कलांवर आधारित रियालिटी शोज टेलिव्हिजनवर प्रसिद्ध आहेत. बहुतेक प्रत्येक रियालिटी शो ची अनेक पर्व येऊन गेली असून झी मराठी 'सारेगमप लिटिल चॅम्प्स' चे नवीन पर्व घेऊन येत आहे. या कार्यक्रमातून तावून सुलाखून निघालेले जवळपास सर्वच स्पर्धक संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. झी मराठीवरील या कार्यक्रमावर प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. या कार्यक्रमाने महाराष्ट्राला उत्कृष्ट गायक दिले ज्यांच्या आवाजाची जादू प्रेक्षक कधीच विसरले नाहीत.
‘लिटिल मॉनिटर’ मुग्धा वैशंपायन स्पर्धक नाही तर ज्युरी च्या भूमिकेत
'सारेगमप लिटिल चॅम्प्स' च्या नवीन पर्वातून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत ‘पंचरत्न’. हा कार्यक्रम होऊन अनेक वर्षे झाली असली तरी या कार्यक्रमातील पंचरत्न म्हणजेच ‘प्रिटी यंग गर्ल’ आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, ‘लिटिल मॉनिटर’ मुग्धा वैशंपायन, ‘प्रेक्षकांचा लाडका मोदक’ प्रथमेश लघाटे, आणि रोहित श्याम राऊत यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. हे सर्व आता पुन्हा याच कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ते आता स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरी च्या भूमिकेत दिसतील.
‘प्रिटी यंग गर्ल’ आर्या आंबेकर 'लवकरच कार्यक्रम येणार प्रेक्षकांच्या भेटीस'
आपल्या भावना व्यक्त करताना प्रथमेश लघाटे म्हणाला, "लवकरच 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'चे नवीन पर्व सुरु होणार आहे. यात माझ्यासोबत आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन आणि रोहित राऊत सहभागी होणार आहेत. यावेळी आम्ही स्पर्धक म्हणून नाही तर ज्युरी म्हणून या कार्यक्रमाचा भाग असणार आहोत. ऑडिशनची प्राथमिक फेरी पार पडली असून, लवकरच हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस येईल.”
'आमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरणार'
आपल्या ‘पंचरत्न’ मैत्रीबद्दल सांगताना तो पुढे म्हणाला, “गेली बारा वर्ष आम्ही ५ जण एकमेकांच्या संपर्कात होतो. आता या कार्यक्रमानिमित्त पुन्हा एकदा आमची धमाल, मजा-मस्ती सुरु झाली आहे. प्रथमच ज्युरीची भूमिका निभावत असल्यामुळे त्यासाठी आमची वेगळी तयारी चालू आहे. आम्ही खूप ज्युनिअर असलो तरी मागील १२ वर्षांचा अनुभव चांगला आहे. ऑडिशनमध्ये सहभागी झालेल्या सर्व मुलांची गाणी आम्ही ऐकली. वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकायला मिळाली. कोणाचा गळा चांगला आहे. कोणाची तान छान, कोणावर मेहनत घेता येऊ शकते, या गोष्टी समजत असल्यामुळे हा आमच्यासाठी एक वेगळा अनुभव ठरणार आहे. आताची मुल, टॅलेंटेड तर आहेतच पण स्मार्ट देखील आहेत. त्यामुळे या पर्वात मजा येणार आहे."
प्रेक्षकांचा लाडका कार्यक्रम ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स' लवकरच पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, झी मराठीवर.
हेही वाचा -विरोधकांचे तोंड बंद करण्यासाठी कंगना रानौतने पोस्ट केला घोडेस्वारीचा व्हिडीओ!