मुंबई- ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आदेश बांदेकर म्हणजे सगळ्यांचे लाडके आदेश भावोजी गेली १६ वर्षे प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात सुद्धा होम मिनिस्टर घरच्या घरीच्या माध्यमातून आदेश भावोजी तमाम महाराष्ट्रातील वहिनींची ऑनलाईन भेट घेत आहेत. आता आदेश भावोजी होम मिनिस्टर घरच्या घरीच नवीन पर्व 7 सप्टेंबरपासून आपल्या भेटीला घेऊन येत आहेत, या पर्वाच नाव आहे "होम मिनिस्टर माझा बबड्या."
'होम मिनिस्टर'च्या नवीन पर्वात सासू-सून पैठणीसाठी भिडणार, त्यात त्यांचा 'बबड्या' अडकणार - होम मिनिस्टर माझा बबड्या
आदेश बांदेकरांना संपूर्ण महाराष्ट्र 'होम मिनिस्टर' या टीव्ही कार्यक्रमामुळे ओळखतो. आता या कार्यक्रमाचे नवे पर्व सुरू होणार असून याचे शीर्षक असेल "होम मिनिस्टर माझा बबड्या." हा बबड्या कोण, आणि नव्या कार्यक्रमाचे स्वरुप काय असेल हे जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी...
आता तुम्हाला वाटलं असेल हे काय नवीन, तर 'अग्गबाई सासूबाई' मधील 'बबड्या' हे पात्र खूपच चर्चेचा विषय झाले आहे. सध्या घराघरापासून नाक्या नाक्यावर इतकंच काय राजकीय नेत्याच्या तोंडावर देखील बबड्याचंच नाव आहे. आशुतोष पत्कीने आपल्या अभिनयातून या पात्राला पुरेपूर न्याय दिलाय. प्रत्येक मूल हे आपल्या आईचे लाडके असते आणि प्रत्येक मुलात एक बबड्या लपलेला असतो. अशीच 'बबडेगिरी' एका मजेशीर पद्धतीने या नवीन पर्वातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.
या नवीन पर्वात आदेश भावोजी 'वाहिनी त्यांचे मिस्टर आणि सासूबाई' यांचे नातेसंबंध उलगडतील. यामध्ये खरी कसोटी लागेल ती मिस्टरांची. तेव्हा सासू आणि सून आता पैठणीसाठी भिडणार, पण यात मात्र त्यांचा बबड्या अडकणार, अशी थीम यानिमित्ताने या कार्यक्रमातून आपल्याला पाहायला मिळेल.