हल्लीच्या मालिकांत समाजाचे प्रतिबिंब दिसते. पती-पत्नी विभक्त होण्याचं प्रमाण वाढलंय आणि त्यामुळे एकल पालकांकडून मुलांचं संगोपन होताना अर्धटवता जाणवतेय. मुलांना दोन्ही पालकांचं प्रेम हवं असतं आणि ते त्यांच्या वैचारिक आणि भावनिक विश्वासाठी महत्वाचं असतं. बालपणाच्या या भावविश्वात एकाचं जरी प्रेम अपुर पडलं, मिळालं नाही तर त्याचे व्रण आयुष्यभर मनावर कोंदणासारखे राहतात. बालपणाचा पायाच जर अनेक वेदनांनी आणि कटू आठवणींनी भरलेला असेल तर ते बालपण कधीच आयुष्यातील सुंदर पान वाटू शकणार नाही. असं म्हणतात की आयुष्याच्या पुस्तकातलं सर्वात सुंदर पान म्हणजे बालपण. आई वडिलांच्या प्रेमाच्या बळावर प्रत्येक मूल अनेक अडचणींवर मात करू शकतं. दु:ख आणि वेदनेच्या निखाऱ्यावरून हसत हसत चालू शकतं. याच धाग्यावर आधारित आई आणि मुलीचं भावनिक नातं हळुवारपणे उलघडणारी हृदयस्पर्शी मालिका कलर्स मराठीवर घेऊन येत आहे ‘लेक माझी दुर्गा - जाणीव ‘ती’ च्या अस्तित्वाची’.
या मालिकेद्वारे आई आणि मुलीच्या नात्या पलीकडे समाजामध्ये घडणाऱ्या, चर्चित आणि अतिशय नाजूक विषयाला एका वेगळ्याच प्रकारे प्रेक्षकांच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. मालिकेमध्ये दुर्गाच्या भावविश्वात कुठेतरी वडिलांकडून तिला तुच्छ दर्जाची वागणूक मिळते आहे तर दुसरीकडे आईचे भरभरून प्रेम मिळते आहे. दुर्गाला आईच्या प्रेमापेक्षा तिच्या वडिलांच्या डोळ्यातील आग सलतेय. तिच्या या भावविश्वात तिला स्वत:च्या अस्तित्वासाठी संघर्ष करावा लागतो आहे. तिला वडिलांकडून झिडकारल जातं आहे. असा भेदभाव का होत असेल हे या मालिकेमधून मनोरंजनासोबत समाजात सुरू असलेल्या चालीरीती, सत्यपरिस्थिति आणि बालपणीची निरागसता यांची सांगड घालत समाजिक संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
सातार्याजवळ एका छोट्या गावात राहणार्या जगताप कुटुंबाच्या दुर्गाचे भावविश्व इतर लहान मुलांपेक्षा वेगळं आहे. जिथे तिला खेळायला मोठं आंगण आहे, घरात प्रेम करणारी, माया देणारी आई आहे तसेच प्रेमळ, खाऊ देणारा, सगळ्यांना प्रेम करणारा बाबा आहे. दुरून जरी हे चित्र सुंदर दिसत असलं तरीदेखील दुर्गाला मात्र एक प्रश्न सतत पडतो आहे माझा बाबा मला दूर का बरं ठेवतो? माझ्यावर का प्रेम नाही करत? मी इतकी वाईट आहे का? तिच्या वडिलांच्या मते ती घराला लागलेली कीड आहे. त्यामुळे तिच्या वाटणीचे प्रेम, माया देखील दुसर्या मुलीला देत आहे. अग्रगण्य क्रीएशन्स निर्मित आणि अभिजीत गुरु लिखित ‘लेक माझी दुर्गा’ मालिकेद्वारे हेमांगी कवी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अनिकेत जोशी, व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, (वायकॉम18) म्हणाले की, “कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेच्या घवघवीत यशानंतर त्याजागी एखादी दमदार आणि वेगळ्या धाटणीची मालिका आणण्याचा आमचा प्रयत्न होता. ‘लेक माझी दुर्गा’ या मालिकेतून अत्यंत महत्वाच्या बाबीवर प्रकाश टाकण्यात येणार आहे, जसे हळूहळू मालिकेचे कथानक पुढे जाईल तसे प्रेक्षकांना समजेलच. या मालिकेत दाखविण्यात येणार्या गोष्टी आपण अजूनही समाजात घडताना बघतो, त्यामुळे त्या अधिक अचूक पद्धतीने दाखविण्याची आमची जबाबदारी वाढते. आपल्या सगळ्यांनाच भावणारं आणि जवळचं नातं म्हणजे आई-मुलांचं नातं. त्याच पार्श्वभूमीवर या मालिकेची मांडणी करण्यात आली आहे. या नवीन वर्षातली आमची पहिली मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेलं अशी आम्ही आशा करतो. बाळूमामाच्या नावानं चांभागलं या मालिकेची वेळ बदलण हा सर्वांगी विचार करून घेतलेला निर्णय असून प्रेक्षकांचे प्रेम त्या मालिकेलाही मिळत राहील अशी आशा आम्ही करतो.”