कुठल्याही चांगल्या गोष्टीचा कधीनाकधी अंत होतोच. ‘देवमाणूस’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला. उत्कंठापूर्ण कथानकामुळे त्यातील सस्पेन्स वाढत असताना या मालिकेतील थरार प्रेक्षकांना आवडला. परंतु अखेर देवमाणसाचा अंत आता जवळ आला आहे. झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियतेचं शिखर गाठलं. या मालिकेचं कथानक तसंच त्यातील व्यक्तिरेखा या सगळ्यावरच प्रेक्षकांनी प्रेमाचा वर्षाव केला. डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग याची भूमिका अभिनेता किरण गायकवाडने एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवली.
डॉ. अजितकुमार देव याचा मुखवटा अखेरीस आता उतरणार असून त्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार आहे. डॉक्टर हा देवीसिंग आहे हे आता सगळ्यांना कळणार आहे. ही मालिका आणि देवीसिंगची भूमिका खूप जवळची असल्यामुळे या मालिकेला निरोप देताना मन भरून आलं अशा भावना अभिनेता किरण याने व्यक्त केल्या.
जवळपास वर्षभर देवमाणूस या मालिकेने प्रेक्षकांना खिळवून ठेवलं होतं त्यामुळे प्रेक्षकांना या मालिकेला निरोप देताना वाईट वाटणं साहजिक आहे. पण प्रेक्षकांसाठी या मालिके शेवट १५ ऑगस्ट रोजी २ तासांच्या विशेष भागात सादर केला जाणार आहे. त्याबद्दल बोलताना किरण म्हणाला, "देवमाणूस या मालिकेने माझी एक वेगळी ओळख निर्माण केली. हा कार्यक्रम आणि माझी त्यातील भूमिका ही नेहमीच माझ्या जवळची राहील कारण या भूमिकेने मला प्रेक्षकांचं अफाट प्रेम आणि पाठिंबा मिळवून दिला.”