‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील दीपा-कार्तिकच्या नात्यातली कटुता जुळ्या मुलींच्या जन्मानंतर तरी दूर होईल असं वाटत होतं. सौंदर्याने पुढाकार घेत या दोघांमधले गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर दीपाची एक मुलगी आपल्या घरात आणून कार्तिकचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती बदलण्याचं नाव घेत नाहीय. त्यामुळे दीपा-कार्तिक आणि त्यांच्या मुलींच्या नात्याचं भवितव्य नेमकं काय असणार याची उत्सुकता आता वाढली आहे.
दीपाने जुळ्या मुलींना जन्म दिला असला तरी दोन्ही मुली दोन वेगळ्या घरात वाढत आहेत. परंतु आता स्टार प्रवाहवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत दीपा आणि कार्तिकच्या मुलींचा नामकरण सोहळा पाहायला मिळणार आहे. कार्तिकने मुलींचं पितृत्व नाकारल्यामुळे दीपाने एकटीने मुलीला वाढण्याचा निर्धार केला आहे. तर दीपाची खूण म्हणून सौंदर्याने दीपाची एक मुलगी आपल्या घरी वाढवण्याचं ठरवलं आहे. दोन्ही मुली जरी वेगवेगळ्या घरात वाढत असल्या तरी योगायोगाने दोघींचा बारसं मात्र एकाच दिवशी आणि एकाच ठिकाणी होणार आहे.